खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांचा उपचार सुरू करा
समाजवादी पक्षातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन
विवेक तोटेवार, वणी: तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. स्थिती बिकट झाल्यास रुग्णाला बाहेरगावीच रेफर करावे लागते. शहरातील खासगी रुग्णालयात कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांना हवी असणारी सर्व सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे खासगी कोविड केअर सेंटरला परवानगी द्यावी अशी मागणी समाजवादी पक्षातर्फे करण्यात आली आहे. आज बुधवारी दिनांक 9 सप्टेंबर रोजी रज्जाक पठाण यांनी याबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.
तालुक्यात कोरोना रुग्णांसंख्येने त्रिशतकाकडे वाटचाल केली आहे. तालुक्यातील रुग्णांसाठी शहराजवळील परसोडा येथे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. परंतु रुग्णाची स्थिती बिकट असल्यास त्यास उपचारासाठी यवतमाळ किंवा नागपूर येथेच रेफर करावे लागते. अशा परिस्थितीमध्ये रुग्ण दगावण्याची किंवा स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असते.
अलिकडेच वणीत तीन रुग्णांचा कोरोनामुळे जीव गेला. त्यांना जर वेळीच योग्य उपचार मिळाला असता तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. याशिवाय कोविड केअर सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याचा आरोप होत आहे. याबाबत व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
त्यामुळे वणीतील खासगी रुग्णालय कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी खुले करावे व खासगी रुग्णालयाला कोविड केअर सेंटर करावे अशा आषयाचे निवेदन समाजवादी पक्षाचे रज्जाक पठाण यांच्यातर्फे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.