अबब…हे काय ! चक्क गॅस सिलिंडरच्या टाकीतून दारू तस्करी

वणी पोलिसांनी केला दारू तस्करांचा पर्दाफाश

0
रवी ढुमणे, वणी: चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली अन दारू तस्करीला चांगलेच उधाण आले.  विविध शक्कल लढवीत तस्करांनी दारूची तस्करी सुरू केली. यात ऍम्बुलंस ते लग्नाच्या वरातीतून दारू तस्करीची शक्कल होती. आता आणखी एक शक्कल दारू तस्करींनी वापरल्याचं समोर आलंय. चक्क गॅस सिलिंडरमधून दारू तस्करी करणाऱ्याच्या मुसक्या वणी पोलिसांनी आवळल्या आहे.
चंद्रपूर जिल्हा दारूबंदी झाली अन विविध स्तरातील लोक अवैध दारू व्यवसायाकडे वळले आहे. दारू तस्करीत महिला सुद्धा मागे नाहीत. यापूर्वी एसटी बसेस मधून महिलांना दारूची तस्करी करतांना रंगेहाथ पकडल्याच्या घटना घडल्या आहेत. असाच प्रकार शुक्रवारी अनुभवायला  मिळाला. वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुकुंद कुळकर्णी हे शुक्रवारी दुपारी साडेचार चे सुमारास गस्तावर असतांना त्यांना दोघे जण गॅस सिलिंडर मधून दारू घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून ठाणेदार कुलकर्णी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनात लालगुडा चौफुलीवर डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, शेख नफिस, उल्हास कुरकुटे, दिलीप जाधव यांना घेऊन सापळा रचला.
मिळालेल्या माहितीच्या आधारे वणीकडून चंद्रपूरकडे दोन युवक पल्सर दुचाकी क्रमांक एम एच 29 इ झेड 0490 वर सिलिंडर घेऊन येताना दिसले. जसे ते जवळ आले तसे त्यांना थांबवून तपासणी केली असता, गॅस सिलिंडर च्या टाकीला छिद्र पाडून त्यात ९० मिलीच्या च्या जवळपास २०० दारूच्या बाटला आढळल्या. याची किंमत सुमारे ६ हजार रुपये आहे.
पोलिसांनी नितीन अशोक भगत (२५) साखरवाही, व सुमित रमेश आसुटकर (२०) मासाळा या दोघांना ६० हजार रुपये किमतीच्या दुचाकीसह ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.
शक्कल लढवून सिलिंडर मधून दारूची तस्करी करणारे हे दोघं चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.