सुशील ओझा, झरी: मुकुटबनसह परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ते पाहता मुकुटबन शहराला कोरोनाचा आजारापासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने मुकुटबन व्यापारी असोसिएशनने संपूर्ण बाजारपेठ मंगळवारपासून तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता महावीर भवनमध्ये सर्व व्यापाऱ्यांची बैठक झाली. अध्यक्ष विजय कोठारी, उपाध्यक्ष मंगेश गादेवार व सचिव प्रदीप मासिरकर यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.
सर्वप्रथम दिवंगत व्यापारी रमेश अक्केवार श्रद्धांजली वाहण्यात आली. बैठकीत प्रत्येक व्यापारी यांचे मत जाणून घेण्यात आले. त्या अनुषंगाने मंगळवार १५ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर पर्यंत तीन दिवस संपूर्ण बाजारपेठ कडक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. लॉकडाऊन दरम्यान औषधी दुकान उघडे राहणार आहेत. तर सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत दूधविक्रीची दुकाने सुरू राहणार आहेत. लॉकडाऊन दरम्यान कोणत्याही व्यापारी यांनी दुकानाच्या मागील गेटने किंवा दुकान उघडून सामानाची विक्री करण्यास सक्त बंदी घातली आहे. असे केल्यास ५ हजार रुपयांचे दंड आकारण्यात येतील. तीन दिवस बाजारपेठ बंद नंतर पुढच्या आठवड्यातसुद्धा तीन दिवस बंद ठेवणार असल्याची माहिती आहे. बैठकीत प्रत्येक दुकानदार व नोकर यांनी मास्क व सॅनिटायझर वापरणे अनिवार्य केले आहे.
तालुक्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत घडल्याने नागरिकांच्या मनात मोठी धास्ती निर्माण झाली आहे. याच अनुषंगाने मुकुटबन व्यापारी असोसिएशनने घेतलेला निर्णय योग्य असून ग्रामवासियांतर्फे स्वागत होत आहे. बैठकीत सर्वच व्यापारी उपस्थित होते.