विवेक तोटेवार, वणी: शहरातील दीपक चौपाटी परिसरात बुधवारी 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.15 वाजता दोन इसमांमध्ये झालेल्या भांडणात एकाला आपला जीव गमवावा लागला. मृतकाचे नाव प्रफुल बंडू गारुडे (28) होते. मृतकाच्या पत्नीच्या (वेणू प्रफुल गारुडे) तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती आहे.
सविस्तर वृत्त असे की, प्रफुल बंडू गारुडे (28) रा. रामपुरा वार्ड हा दीपक चौपाटी परिसरातील किंगस्टार बार व करण बार येथे काम करीत होता. याच ठिकाणी अमोल शंकर काकडे (28) रा. शास्त्रीनगर याचे दुकान होते. याच्यासोबत बुधवारी सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. येथे असणाऱ्या कुणालाही भांडणाचे कारण समजले नाही.
भांडणात अमोलने प्रफुलच्या पोटावर व डोक्यावर लाकडी दांड्याने वार केले. परंतु काही लोकांनी मध्यस्ती करीत भांडण सोडवून वाद मिटविला. प्रफुल नेहमीसारखा घरी येऊन झोपी गेला तर तो कायमचाच. त्याच्या शरीरावर मारहाण झाल्याची कोणतीही खूण नव्हती. सकाळी प्रफुल न उठल्याने कुटुंबियांची तारांबळ उडाली. प्रफुलचा मृत्यू झाल्याचे समजले.
प्रफुलच्या मागे पत्नी मुलगा व एक मुलगी आईवडील असा मोठा आप्तपरिवर आहे. प्रफुलचा मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता वणीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण समजू शकेल. या घटनेची माहिती प्रफुलच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली.
पोलिसांनी तक्रार दाखल केली. तक्रारीवरून वणी पोलिसांनी कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोधाशोध सुरू केली. आरोपी अमोल हा चौपाटी बारजवळ होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)