मारेगावात कर्फ्यूत ‘जनता टल्ली’, संतापाचे वातावरण
जनता कर्फ्यूवर देशी दारू विक्रेत्यांचे विरजण
नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असल्याने मारेगावातील व्यापारी आणि प्रतिष्ठीत लोकांनी एकत्र येत 4 दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला. आज या जनता कर्फ्यूचा तिसरा दिवस आहे. एकीकडे या कर्फ्यूला 100 टक्के प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे देशी दारूच्या दुकानदारांनी या कर्फ्यूला साथ न दिल्याने कर्फ्यूच्या उद्देशाला हरताळ फासला गेला आहे. शहरातील असलेले चारही देशी दारूचे दुकानं सुरू आहे. परिणामी कर्फ्यूचा उद्देश सफल न होत असल्याने सर्वसामान्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
कोरोना मुक्त असलेल्या मारेगाव तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खासकरून जनतेच्या सुरक्षेसाठी खबरदारी म्हणून चेंबर्स ऑफ कॉमर्स या व्यापारी संघटनेच्या पुढाकारातून 17 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या कालावधीत चार दिवसाचा “जनता कर्फ्यू” लावण्याचा निर्णय घेण्यात आला. या कर्फ्यूला नागरिकांनी साथ देत शहरांतील लहान मोठ्या दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून पाठिंबा दिला.
बारची साथ तर देशीने सोडली साथ
शहरातील वाईन बार सह सर्व दुकाने शंभर टक्के बंद ठेवून जनता कर्फ्यूचे काटेकोरपणे पालन करत आहे. मात्र यवतमाळ महामार्गावर वसंत जिनिंग समोरील, कान्हाळगाव रोड वरील तसेच मार्डी रोडवरील व वणी रोडवरील या चारही देशी दारूच्या दुकान दारांनी आपले देशी दारूचे दुकाने चालू ठेवल्याने शहरातील नागरिकांकडून यांचे विरोधात संताप व्यक्त होत आहे.
या चारही देशी दारूच्या भट्या चालू असल्याने येथे तालुक्यातील गाव खेड्यातील देशी प्रेमींनी हजेरी लावल्याने जनता कर्फ्यूच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. शहरातील जनतेच्या सुरक्षेसाठी छोटे मोठे व्यावसायिक साथ देत असताना केवळ पैसे कमविण्याच्या उद्देशाने देशी दुकानदारांनी दुकान उघडे ठेवल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)