विवेक तोटेवार, वणी: दोन अडीच दशकांपूर्वी वेकोलिने मुंगोली कोळसा खाण प्रकल्प सुरू केला. परंतु या प्रकल्पामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. परिणामी ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामना करावा लागत होता. त्यामुळे ग्रामस्थांनी गावाच्या पुनर्वसनाची मागणी वेकोलि प्रशासनाकडे वारंवार केली होती. अखेर वेकोलिने मुंगोली गावाच्या पुनर्वसनाकरिता 60 कोटींची तरतूद केली. वेकोलिने शिंदोला – कुर्ली या दोन गावांदरम्यान 5.18 हेक्टर शेतजमीन खरेदी केली. बुधवारला नियोजित जागेवर गाव पुनर्वसनाचा फलक लावण्यात आला. मुंगोली गावाचा अनेक वर्षे रेंगाळत असलेला पुनर्वसनाचा प्रश्न सुटल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
वणी तालुक्यातील मुंगोली गाव लगत 25 वर्षांपूर्वी कोळसा खाण प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पाकरिता मुंगोलीसह, साखरा, कोलगाव, शिवणी शिवारातील शेतजमिनीचे वेकोलिने संपादन केले. खाण प्रकल्प गावा शेजारी असल्याने अनेक समस्यांनी गावकऱ्यांची डोकेदुखी वाढली. खाणीतील माती वर्धा नदीच्या किनाऱ्यावर टाकल्याने वर्धा आणि पैनगंगा या नद्यांच्या पुरांचा गावाला धोका निर्माण झाला होता. ब्लस्टिंगमुळे घरांना तडे जाणे, वायू प्रदूषण, विविध आजार, शेत पिकांच्या उत्पन्नात घट, पिण्याच्या पाण्याची टंचाई आदी समस्यांनी ग्रामस्थ त्रस्त झाले होते. त्यासाठी ग्रामस्थांनी वेकोलि प्रशासनाविरुद्ध लढा उभारला.
उर्वरित शेतजमीन वेकोलीने संपादित करावी, जमीन धारकांना प्रकल्पात नोकरी द्यावी, गावाचे पुनर्वसन योग्य ठिकाणी करावे आदी मागण्या केल्या. वेकोलिने उर्वरीत शेतजमीन संपादित करून नोकऱ्या दिल्या. मात्र वेकोलि प्रशासन गाव पुनर्वसनाच्या प्रश्नावर उडवाउडवीची उत्तरे देत राहिली. मागील अनेक वर्षांपासून पुनर्वसनाचा लढा चालू होता. मागील पंचवार्षिक काळात लाभलेले सरपंच ऍड. रुपेश ठाकरे यांनी पुनर्वसनाचा प्रश्न उचलून धरला. यासाठी त्यांनी वेळीवेळी आंदोलन करत या प्रकरणाचा पाठपुरावा केला. मुंबई, दिल्ली पर्यंत प्रश्न लावून धरला. वेकोलि प्रशासनाला सळो की पळो करून सोडले.
अखेरीस वेकोलिने गाव पुनर्वसनाची जागा निश्चित केली. त्यासाठी शासकीय स्तरावरील मान्यता घेत गाव पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढला. बुधवारला गाव पुनर्वसनाचा बोर्ड संपादित जागेवर लावला. याप्रसंगी मुंगोलीचे माजी सरपंच रुपेश ठाकरे, दिलदार पठाण, सुधीर भलमे आदी उपस्थित होते. गाव पुनर्वसनासाठी ग्रामस्थांनी जिकरीने लढा दिला. यात माजी सरपंच ऍड. रुपेश ठाकरे यांचा मोलाचा वाटा आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)