वणी बहुगुणी बुलेटीन: 20 सप्टेंबर 2020
जाणून घ्या वणी, मारेगाव, झरी तालुक्यात दिवसभरात काय घडले?
आज दिवसभरात…. अर्थातच वणी बहुगुणी बुलेटीन…
वणीत कोरोनाबाधिताचा मृत्यू तर 3 पॉजिटिव्ह
जब्बार चीनी, वणी: शनिवार पाठोपाठ रविवारीदेखील एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. या घटनेने वणी तालुका हादरला आहे. त्यात रविवारी आणखी 3 पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधिंतांच्या मृत्यूमुळे चिंतेत वाढ होत आहे. रविवारी आलेल्या अहवालानुसार शहरात 3 पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आलेत. वणीतील जैन ले आऊटमध्ये एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. तालुक्यातील बोरगाव येथे 1, भालर येथे 1 तर सुंदरनगर येथे 1 असे 3 कोरोना पॉझिटीव्ह निघालेत.
कोविड हॉस्पिटल प्रकरणात युवासेनेची उडी
जब्बार चीनी, वणी: कोविड हॉस्पिटल प्रकरणात आता शिवसेना प्रणीत युवासेनेने उडी घेतली आहे. जर हॉस्पिटलला सुरक्षा देण्यास प्रशासन असमर्थ असेल तर युवासेना सुरक्षेसाठी पुढाकार घेणार अशी भूमिका युवासेनेचे जिल्हा प्रमुख विक्रांत चचडा यांनी घेतली आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या तालुक्यात वाढत आहे. बेड उपलब्ध नसल्याने लोकांना उपचारासाठी परराज्यात जावे लागत आहे. अशावेळी तालुक्यात कोविड हॉस्पिटल सुरू होणे गरज असताना भाजपचे नेते लोकांना भडकवून राजकारण करण्यात दंग आहे, असा आरोपही युवासेनेतर्फे करण्यात आला आहे.
चोरांनी दाखवली हुशारी; पण….
तालुका प्रतिनिधी, वणी: चोरांनी खूप हुशारी दाखवली. कोणताच पुरावा किंवा क्लू मिळणार नाही याची काळजी घेतली. तरीदेखील पोलिसांनी आपले कौशल्य दाखवले. तीन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्यात. येथील एका महिला बचतगट कार्यालयात चोरी झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीना ताब्यात घेतले. सदर चोरी प्रकरणी जेरबंद केलेल्या तीनही आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सर्व आरोपींची जिल्हा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. यामुळे वणी शहरातील अन्य चोरी प्रकरणाचा छळा लावण्यास पोलिसांना मदत होणार आहे.
कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांना घेऊन जाताना गावकऱ्यांकडून घेराव
सुशील ओझा, झरी: कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांना रुग्णवाहिका नेत होती. तेव्हा तालुक्यातील वाढोना ( बंदी) बंदीवाढोना फाट्याजवळ काही लोक गाडी अडविण्याकरिता जमा झालेत. जमलेल्या लोकांनी गाडी अडवून समोर आडवे झाले. गावातील एकही माणूस किरोना पॉजिटिव्ह नाही. रिपोर्ट खोटा आहे असे बोलू लागले. गावकऱ्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यावरून तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन गेडाम यांनी मुकुटबन पोलीस स्टेशनला तक्रार दिली.
अखेर ‘त्या’ शेतगड्याचा मृत्यू
विवेक तोटेवार, वणी: पंधरा दिवसांपूर्वी मंदर येथील एका शेतगड्याला फवारणी करताना सर्पदंश झाला होता. उपचारानंतर रुग्णालयातून सुटी घेऊन तो घरी आला. मात्र त्याचा दि. 19 शनिवारी रात्री अचानक त्याचा मृत्यू झाला. तालुक्यातील मंदर येथील शेतकरी पुरुषोत्तम बोढे यांच्या शेतात सोयाबीन पिकात कीटकनाशकाची फवारणी करताना महादेव बापूराव मडावी (39) याला 15 दिवसांपूर्वी सर्पदंश झाला होता. वणी येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
विनयभंग प्रकरणी एकास शिक्षा
नागेश रायपुरे, मारेगाव : पोलिस स्टेशन मारेगाव हद्दीत येत असलेल्या एका महीलेचा येथीलच एका इसमाने विनयभंग केला होता. या घटनेची तक्रार मारेगाव पोलिसांत केल्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले होते.सबळ पुराव्यामुळे सुनावणीत मारेगाव न्यायालयाने आरोपीस एक वर्षाची शिक्षा व 3 हजार रुपये दंड ठोठावला. मनोज सूर्यभान पावले (27) रा.मांगरूळ असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. मारेगाव पोलिसांची सतर्कता आणि वेगवान हालचालींमुळे या प्रकरणाला गती मिळाली.
गावाने लावला जोर अन् पळून गेलेत चोर
संजय लेडांगे, मुकुटबन: गाव करी ते राव न करी म्हणातात. गावाने एकजूट करून चोरीचा मोठा डाव उधळून लावला. हिरापूर (मांगली) आणि भेंडाळा गावात गावकऱ्यांनी चोरट्यांचा डाव हाणून पाडला. मांगली (हिरापूर) परिसरात चोरटे चांगलाच धुमाकूळ माजवीत सक्रिय झाले आहेत. परिसरात चोरट्यांची भीती कायम आहेत. तरीदेखील गावकरी एकजुटीने या संकटाचा सामना करीत आहेत. मुकूटबन येथील बाजारपेठेत असलेल्या किराणा दुकान, हॉटेल आणि पानसेंटर फोडून चोरट्यांनी मोठा डल्ला मारत. आता परिसरातील गावातही सक्रिय झाले आहेत. १७ सप्टेंबरच्या रात्री भेंडाळा गावातील दोन घरांची दारे तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांपूर्वी हिरापूर गावातही या चोरट्याने घराची खिडकी फोडून प्रवेश केला. पण चोरांचा डाव फसला.
आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र शिरपूर पोलीस ठाण्याला
विलास ताजने, वणी: इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स फॉर स्टॅंडरायझेशन हे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र शिरपूर पोलीस स्टेशनला मिळालं. या सर्टिफिकेटमुळे शिरपूर पोलीस स्टेशनच्या कामकाजाचा दर्जा वाढला आहे. नियमावलीतील निकषांची पूर्तता केल्यामुळे वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याला आय.एस.ओ. प्रमाणपत्र देऊन नुकतेच गौरविण्यात आले.
शिवारात वन्यप्राण्यांचा हैदोस, खरीप पिकांचे नुकसान
तालुका प्रतिनिधी, वणी: यंदा तालुक्यातील खरीप हंगामातील पिकपरिस्थिती समाधानकारक आहे. मात्र काढणीस आलेल्या खरीप पिकांचे वन्य प्राणी नुकसान करीत आहेत. हातातोंडाशी आलेले पीक नष्ट होत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. नुकतेच मेंढोली येथील शेतकरी दीपक सुधाकर बलकी यांच्या शेतातील कपाशी पिकांचे रानडुक्करांनी प्रचंड नुकसान केले आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांकडून झालेल्या शेतपिकांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे.
आमदारांच्या अनास्थेमुळे वणीत उपजिल्हा रुग्णालय नाही: राजू उंबरकर
जब्बार चीनी, वणी: वणीसाठी उपजिल्हा रुग्णालय मंजूर झाले. मात्र आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या अनास्थेमुळे वणीत उपजिल्हा रुग्णालय झाले नाही असा आरोप मनसेचे राजू उंबरकर यांनी पत्रकार परिषदेत केला. याशिवाय कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ग्रामीण रुग्णालयातील ट्रामा सेंटर येथे तात्काळ कोविड सेंटर सुरू करावे अशी मागणीही त्यांनी केली. 2013 मध्ये महाराष्ट्र शासनच्या आरोग्य विभागाने वणी 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयात 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयात अपग्रेड करावे असा आदेश काढला होता. मात्र आमदारांनी हे प्रकरण दपडत यात कोणताही पाठपुरावा न केला. त्यामुळे वणीत उपजिल्हा रुग्णालय झाले नाही असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
शिंदोल्या जवळ होणार मुंगोली गावाचे पुनर्वसन !
विवेक तोटेवार, वणी: दोन अडीच दशकांपूर्वी वेकोलिने मुंगोली कोळसा खाण प्रकल्प सुरू केला. परंतु या प्रकल्पामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. परिणामी ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामना करावा लागत होता. त्यामुळे ग्रामस्थांनी गावाच्या पुनर्वसनाची मागणी वेकोलि प्रशासनाकडे वारंवार केली होती. अखेर वेकोलिने मुंगोली गावाच्या पुनर्वसनाकरिता 60 कोटींची तरतूद केली. वेकोलिने शिंदोला – कुर्ली या दोन गावांदरम्यान 5.18 हेक्टर शेतजमीन खरेदी केली. बुधवारला नियोजित जागेवर गाव पुनर्वसनाचा फलक लावण्यात आला. मुंगोली गावाचा अनेक वर्षे रेंगाळत असलेला पुनर्वसनाचा प्रश्न सुटल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
लोढा हॉस्पिटलचे सोमवारपासून सत्यसेवा हॉस्पिटलमध्ये स्थलांतरण
विवेक तोटेवार, वणी: वणीतील तेली फैल येथील लोढा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सोमवार दिनांक 21 सप्टेंबरपासून सत्यसेवा हॉस्पिटल झेड पी कॉलनी यवतमाळ रोड येथे स्थलांतर होत आहे. त्यामुळे रुग्णांनी आता नवीन ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन लोढा हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)