वणी तालुक्यात पायाभूत चाचणीचा उडाला बोजवारा
पेपरचा अपुरा पुरवठा, पेपरच्या झेरॉक्स काढण्याचे शिक्षकांना आदेश
विलास ताजने, वणी: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०१७-१८ करिता शैक्षणिक प्रगती चाचण्यांचे आयोजन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. मात्र या पायाभूत चाचण्याचा ढिसाळ नियोजनामुळे पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र वणी तालुक्यात दिसून येत आहे.
काय आहे शैक्षणिक प्रगती चाचणी ?
सदर कार्यक्रमाअंतर्गत एकूण तीन चाचण्यांचे आयोजन वर्षभरात करण्यात आले आहे. वर्ग १ ते २ करीता प्रथम भाषा व गणित, वर्ग ३ ते ५ करिता प्रथम भाषा, गणित व इंग्रजी तर वर्ग ६ ते ९ करिता प्रथम भाषा, गणित, इंग्रजी व विज्ञान या विषयांचा समावेश आहे.
सदर प्रत्येक चाचणी नंतर विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद घेणे आवश्यक आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पर्यवेक्षकिय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. चाचणी निकालाच्या आधारे नियोजनबद्ध गुणवत्ता विकास कार्यक्रमाची आखणी केली आहे.
मात्र ७ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या या पायाभूत चाचणीला आवश्यक विषयाचे पेपर न मिळाल्याने शिक्षकांची धावपळ झाली आहे. केंद्र प्रमुखाने पेपरच्या झेरॉक्स काढण्याचे आवाहन शिक्षकांना केले आहे. परंतु झेरॉक्स काढण्याचा खर्च कुणी करायचा याबाबत मौन पाळले आहे.
पेपर उपलब्ध न झाल्याने अनेक शाळांचे शिक्षक द्विधा मनस्थितीत आहे. परिणामी सध्यातरी या पायाभूत चाचणीचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र वणी तालुक्यातील शाळेत पाहायला मिळत आहे.