नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी विधवांचा संताप

प्रधानमंत्री मोदींच्या विरोधात आंदोलन, कंगणाचा पुतळा जाळला

0

अयाज़ शेख, पांढरकवडा: केंद्र सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधित दोन कायदे संसदेत पारीत केले आहे. या नवीन कायद्यांविरोधात शेतकरी विधवांनी सोमवारी पांढरकवडा येथे प्रचंड घोषणाबाजी करीत आपला सरकार विरोधी संताप व्यक्त केला. दरम्यान ही दोन्ही विधेयके परत न घेतल्यास दिनांक 25 सप्टेंबर पासून विदर्भात तीव्र आंदोलन सुरु करण्याचा इशारा शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी दिला आहे. विशेष म्हणजे सिने अभिनेत्री कंगना राणावतने शेतकरी नेत्यांविरुध्द अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे तिचीही प्रतिमा जाळण्यात आली.

केंद्र सरकारने पारीत केलेल्या या कायद्यांविरोधात देशभर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. हे कायदे व्यापारीधार्जीने असून त्यामुळे शेतक-यांची प्रचंड लूट होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. शेतकरी विधवा संघटनेच्या अपर्णा मालीकर, भारती पवार, सुनीता पेंदोर, रेखा गुरुनुले, सरस्वती अम्बरवार यांच्या नेतृत्वात आज या कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

विधेयक मागे न घेतल्यास संपूर्ण विदर्भात आंदोलन करण्याची घोषणा किशोर तिवारी यांनी केली. शेतकरी विधवा भारती पवार यांनी केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याचा विरोध करण्यासाठी तसेच सिने अभिनेत्री कंगना राणावत हिने शेतकरी नेत्यांबद्दल गैरवक्तव्य केल्यामुळे तिचा निषेध करण्यासाठी आंदोलन केल्याचे सांगीतले. या आंदोलनात मोठया प्रमाणात शेतकरी विधवा सहभागी झाल्या होत्या.

कंगणाची प्रतिमा जाळली

सिने अभिनेत्री कंगना राणावत हिने नुकतेच शेतकरी नेत्यांविरोधात अपमानास्पद वक्तव्य केले आहे. एवढेच नव्हे तर शेतकरी नेत्यांबद्दल गैरोद्गार  काढलेत. असा शेतकरी विधवांनी आरोप केला आहे. दरम्यान पांढरकवडा येथे कंगना राणावतची प्रतिमा जाळून शेतकरी विधवांनी तिचा निषेध केला. यावेळी प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी तसेच कंगना राणावतच्या विरोधात प्रचंड घोषणा देण्यात आल्यात.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.