सुनील इंदुवामन ठाकरे, वृत्तसंपादक: पत्रकार आणि वाचक म्हणून रोज वेगवेगळ्या बातम्या हातात येतात. त्यातील सर्वात अस्वस्थ करणाऱ्या बातम्या म्हणजे, आत्महत्यांच्या. वणी, मारेगाव आणि झरी या तीन तालुक्यांच्या बातम्या ‘वणी बहुगुणी’ या पोर्टलवरून येतात. का होत असाव्यात इतक्या आत्महत्या? हादेखील चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे.
मानवी मनाच्या पोटेंशियल आणि कायनॅटीक या दोन अवस्था असाव्यात. मानसशास्त्रीय शब्द नव्हे, तर विषयाला सोपं करण्यासाठी मी हे शब्द वापरतोय. पोटेंशियल म्हणजे आपले विचार, कल्पना अथवा तसंच काहीतरी समजुयात. जे प्रत्यक्ष कृतीत येतं ते कायनॅटीक असं आपण गृहीत धरूयात. शक्यतो आपण कोणतीही कृती करण्यापूर्वी आधी त्याचा विचार करतो. त्याचं कल्पनाचित्र उभं करतो. मगच अॅक्शन घेतो.
साधा चहा जरी प्यायचा म्हटलं तरी आधी तो विचार येतो. त्यानंतर मग आपण तो कुणाला तरी करून मागतो. स्वतः करतो किंवा कुठेतरी टपरीवर प्यायला जातो. कुणी अचानक हातात चहाचा कप आणून देतो, तो भाग वेगळा. साधी चहाची कल्पना किंवा विचार आधी येतो. मग आपण पुढील अॅक्षन्सपैकी एक निवडतो.
आत्महत्या करताना ती करणारा कदाचित ही अॅक्षन डायरेक्ट घेत नसावा. त्या आधी त्याचं रफ स्केच तो मेंदूत तयार करत असावा. नंतर ती प्रत्यक्ष कशी करावी, याचं तो नियोजन करीत असावा. नंतर तो अॅक्षन घेतो. विचार आणि प्रत्यक्ष अॅक्षन यात एक पॉइंट असतो. त्या पॉइंटवरच सगळं काही डिपेंड असतं. तो सांभाळता आला म्हणजे झालं.
मेंदूतील अनेक केमिकल लोचे या आत्महत्यांमागे असतात. काही वास्तविक कारणांमुळेदेखील तणाव वाढतो. कर्ज, पैसा, लैंगिक समस्या, कौटुंबिक संबंध, संशय, प्रत्यक्ष भीती, चरित्रावर आलेले डाग, अपयश, नैराश्य ही अनेक कारणं आत्महत्यांमागे असू शकतात.
सगळ्या समस्यांवर सोल्यूशन निघेलच असं नसतं. तरीदेखील त्यासाठी पहिला आणि काही प्रयत्न करणं आवश्यक असतं. तो प्रयत्न म्हणजे आपली समस्या कुणाजवळ तरी बोलून दाखवणं. मनातील विचारांना आउटेलट पाहिजेच. बोलून दाखवलं तर अनेकदा प्रश्न सुटतात. अनेकदा त्या सुटल्या नाहीत, तरी मार्ग मिळतो. ती समस्या कुणाजवळ सांगितली म्हणून हलकं तरी वाटतं. मनोपचारक आणि समुपदेशक डॉ. पंकज वसाडकर म्हणतात त्याप्रमाणे ‘अव्यक्त’ संवाद असला पाहिजे.
लास्ट पॉसिबिलीटीचा विचार प्रत्येकवेळी केला पाहिजे. अर्थात काही झालंच तर जास्तीत जास्त काय होईल. जर कुणावर खूप कर्ज असेल, तर त्याला काय करता येणं शक्य आहे? त्याचे वाईटात वाईट काय परिणाम होतील? त्यातून आपल्याला कसं कर्जमुक्त होता येईल? याचा विचार करायला हवा.
कर्जाचं ओझं वाढत चालला असताना आपण अनावश्यक खर्च टाळू शकतो. ज्याच्याकडून कर्ज घेतलं त्याच्याकडून काही वेळ किंवा सवलत मागू शकतो. कर्ज फेडण्यासाठी काही तरतूद किंवा प्रयत्न करू शकतो. त्यासाठी कमी अथवा जास्त वेळ लागू शकतो. ‘जान है तो जहान है’ या तत्त्वावर चालायला पाहिजे. आपण जिवंत राहिलो तरच आपण त्यावर सोल्यूशन काढू शकतो. हेच आपण अन्य विषयांसाठीदेखील वापरू शकतो.
आपल्या डोक्यात कल्पनाचित्रांचा गोंधळ अनेकदा सातत्याने वाढतो. आपण भविष्यातल्या वाईट परिणामांचा चिखल मेंदूत साचवत असतो. त्यामुळे आपली विचारक्षमता आणि निर्णयक्षमता खुंटते. थांबते. त्याचे परिणाम मग केलेल्या कल्पनेप्रमाणेच पुढे येतात. ऱ्होन्डा बायरन या लेखिकेने ‘द सिक्रेट’ या पुस्तकात आपण केलेले विचार आणि त्यांचे रिझल्टस् यावर विस्ताराने लिहिलंच आहे. ‘द लॉ ऑफ अट्रॅक्शन’ हा त्याचा मूळ विषय आहे.
आपल्या कल्पना किती घातक आणि बाधक असतात याचं उदाहरण पाहू. अनेकदा आपण सर्पदंशाने मृत्यूच्या बातम्या ऐकतो, वाचतो किंवा पाहतो. सर्पतज्ज्ञ सांगतात, की सर्वच साप विषारी नसतात. तरीही अनेकदा बिनविषारी साप चावल्यावरही पुढील व्यक्ती मरते.
एक किस्सा ऐकला होता. त्यानुसार एका अपराध्याला मृत्यूदंडाची शिक्षा झालेली असते. तिथल्या नियमांप्रमानं सर्पदंशानं ती शिक्षा द्यायची असते. मग त्या अपराध्याच्या मृत्यूदंडाची तयारी पूर्ण होते. त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधतात. दोन टाचण्या त्याच्या हाताला टोचतात. त्या अपराध्याला डोळ्यावरील पट्टीमुळे काहीच दिसत नसतं. त्याला टोचलेल्या टाचण्या म्हणजे सर्पदंशच वाटतो. काही क्षणातच तो मरतो. याही पुढे ही कहाणी सांगतात, की त्याच्या शरीरात सापाचं विष झालं म्हणतात.
जर टाचण्या टोचल्यात, तर सापाचं विष कुठून आलं? तर त्याच्या मेंदूने स्वतःहून त्याच्या शरीरात ते तयार केलेलं असावं. मानवी मेंदू निसर्गाचा अत्यंत आज्ञाधारक असतो. तो प्रत्येक अॅक्षनवर लगेच रिअॅक्षन देतो. आजूबाजूला उष्णता वाढली असेल तर घामाने शरीर थंड करतो. बर्फ किंवा थंड पदार्थांना बोट लावलं, तर त्या बोटाच्या जागेवर पुरेसी उष्णता आणतो. नाकात किंवा घषात काही नको ते गेलं की शिंक किंवा खोकला येतो.
अॅक्षनला रिअॅक्षन हा निसर्गाचाच नियम आहे. तरीदेखील अनेकगोष्टी आपण आपल्या विवेकाने करू शकतो. किंबहुना केल्याच पाहिजेत. काही गोष्टींना लगेच रिअॅक्षन दिली पाहिजे. काही गोष्टींना विचार करून पुरेसा वेळ घेऊन रिअॅक्षन दिली पाहिजे. तर काही गोष्टींवर रिअॅक्षन टाळलीच पाहिजे. रिअॅक्षन्सची प्राथमिकता आपल्याला ठरवता आली पाहिजे. त्यावर प्रत्यक्ष काम करता आलं पाहिजे.
कुणी चालणारा खड्ड्यात पडताना आपल्याला दिसत आहे. यावेळी आपण त्वरीत अॅक्षन घेतली पाहिजे. त्याला सावध केलं पाहिजे. कधी कोणी आपल्याला रागारागात बोललात किंवा आरोप करतात. अनेकदा ती खूप जवळची आणि प्रिय व्यक्तीदेखील असते. त्या व्यक्तीच्या तेव्हाच्या विविध मानसिक अस्वस्थेच्या त्या रिअॅक्षन्स असू शकतात. त्यामुळे थोडी वाट पाहावी. त्या व्यक्तीला शांत होऊ द्यावं. नंतरच त्यावर स्पष्टिकरण अथवा खुलासे द्यावेत. त्या व्यक्तीचे समज, गैरसमज दूर करावेत.
काही अॅक्षन्सला रिअॅक्षन्स डायरेक्टच नाकाराव्यात. चक्क नाहीच म्हणावं. आपल्याला पोहता येत नाही. त्यावर जर कोणी आपल्या धाडसावर आपल्याला ‘चढवत’ असेल, तर इथे माघारच घ्यावी. कुणी आपल्याला डोंगरावरून उडी मार म्हटलं की आपण लगेच उडी मारत नाही. आपण त्याच्या अॅक्षनला रिअॅक्षन देत नाही.
आपल्या क्षमतांची जाण ठेवावी. ज्याचं काहीच पॉझिटीव्ह आउटपूट नाही, त्यावर कशाला रिअॅक्षन द्यावी. अनेकदा आपण बसने प्रवास करीत असतो. त्या प्रवासात कुणीतरी सहप्रवासी आपल्यासोबत गप्पा करतो. त्या वाढत जातात. नंतर अमेरिका आणि चिनचे संबंध यावर आपण हमरीतुमरीवर येतो. रिअॅक्षन्वर रिअॅक्षन्स देत राहतो. आपला दोन-तीन तासांचा प्रवास असतो. त्यातही आपण दुनियाभराचं लोड घेतो.
यावेळी आपण स्वार्थी झालं पाहिजे. आपण जो वाद करीत आहोत तो हिताच्या आहे काय, याचा विचार करावा. त्यानुसारच आपण रिअॅक्षन्स द्याव्यात अथवा टाळाव्यात. मरणात कुणाचंच हित नाही. ते स्वतःहून ओढवून घेणं टाळलंच पाहिजे. एका व्यक्तीचा मृत्यू हा केवळ एकट्याचाच नसतो. त्याचा परिवार, गोतावळा यांचाही तो मानसिक, सामाजिक आणि आर्थिक खूनच असतो.
आयुष्यात आता काहीच शिल्लक राहिलं नाही, असं अनेकदा अनेकांना वाटतं. काही कर्ज, काही कौटुंबिक तणाव किंवा अन्य कारणं म्हणजे संपूर्ण आयुष्य नव्हे. अनेकांना हात, पाय नाहीत. अनेकांजवळ पैसा नाही. राहायला घर नाही. पोटापण्याची भ्रांत आहे. तरीदेखील ते संयमाने जगतात. वेगळा मार्ग काढून यशस्वी होतात. प्रत्येकाजवळ काही नाही वेगळी पॉवर आहे. ती ओळखता आली पाहिजे.
पैसा, नाती, प्रतिष्ठा ह्या महत्त्वाच्या आहेतच. यात कुठलीच शंका नाही; मात्र हेच काही आपलं आयुष्य नाही. टेस्ट क्रिकेटच्या मॅचसारखं स्वतःला पीचवर टिकवून ठेवावं लागेल. समस्यांची तुफान बॉलिंग राहीलच. आपण फक्त प्लेट करीत, हुकवत राहावं. मोक्याच्या नेमक्या बॉलची वाट पाहावी. धूम सिक्सर ठोकावा. काळजी एवढीच घावी, की आपली विकेट पडायला नको. क्रिकेटच्या पीचवर असो, की लाईफच्या मैदानावर.
मनाची बँक समृद्ध ठेवा
अंदाजे ६-७ वर्षांपूर्वी विदर्भात ” विश्राम ” प्रोजेक्ट सुरू झाला होता. काही कारणांमुळे तो बंदही पडला. त्या अंतर्गत डॉ विक्रम पटेल ( विख्यात मनोरोगतज्ज्ञ) यांनी शेतकरी आत्महत्यांवर संशोधन केलं. त्यामागील बाजारपेठ, अर्थकारण आणि विविध कारणांचा त्यांनी अभ्यास केला. आत्महत्यांमागील मानसिक कारणं शोधण्यापूर्वीच तो प्रकल्प बंद झाला. आत्महत्या किंवा स्व -हत्या सत्राची साखळीच सुरू झाली आहे. अलीकडच्या काळात ती वाढत आहे. सेलिब्रिटी टू कॉमन मॅन असा कुठलाही सामाजिक- आर्थिक स्तरांवरील व्यक्ती आत्महत्या करीत आहेत. कुटंबातील कर्ता किंवा कर्तीने आपल्या संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केल्याच्या घटना आता नव्या अंगाने दिसत आहेत.
आपल्याजवळ एक थिंक बँक (मनाची समृद्धी टिकवणारी पेढी) यामध्ये आपली विचारपद्धत, भावना हाताळण्यासाठीची तऱ्हा, कडू-गोड आठवणी, आपल्या प्रतिक्रियांची ठेवण, ……असं बरंच काही असतं) ती जपावी लागते. कोवीडमुळे अकल्पित मरण वाढत आहे. असहायता आली आहे. एकच विचार वारंवार करण्याचा ओघ वाढलाय. शंकायुक्त विचार, वस्तुस्थिती नाकारणं, अफवा आणि सत्यता यातला गोंधळ निर्माण करणारी मनोवस्था वाढत आहे. अशा वेळी काहि मंडळींच्या मनाची बॅंक आणि त्यातले व्यवहार गोंधळतात. स्वहत्या, आत्महत्या या स्थितीवर येण्यापूर्वी ती व्यक्ती रोजच भावनिक, वैचारिक पातळीवर तुटत असते. काही भौतिक कारणंपण असतात त्यामागे. नसतातच असं नव्हे. मानसिक परिपक्वता यावेळी खूप महत्वाची आहे. जागतिक मानसिक आरोग्य संघटनेने येणाऱ्या काळात चिंतायुक्त नैराश्य या अवस्थेची भीती व्यक्त केली.
या हतबलतेच्या मनोअवस्थेच्या पुढची पातळी आहे. ती म्हणजे लोकांची आक्रमता वाढण्याची दाट शक्यता. ही हतबलतेची पुढची पायरी असेल. यावेळी अव्यक्त संवाद असावा. ह्या अव्यक्त संवादाचं कौशल्य शिकावं लागणार आहे. आपल्याला कोणाचातरी आधार आहे. धीर आहे, ही भावना ठेवावी. नेहमी सकारात्मक राहून आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे. आपल्या मनाची बँक त्यासाठी समृद्ध करणं गरजेचं आहे.
डॉ. पंकज वसाडकर
मनोपचारक आणि समुपदेशक
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)