विवेक तोटेवार, वणी: नुकतेच केंद्र सरकारने संसदेत पारित केलेल्या कृषी कायद्याविरोधात आज शुक्रवारी दिनांक 25 सप्टेंबर रोजी वणीत आंदोलन करण्यात आले. दुपारी वणीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर महाराष्ट्र राज्य किसान सभा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. सदर कायदा हा भांडवलदार धार्जिना व शेतकरी विरोधी असून हा कायदा तात्काळ रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
केंद्र सरकारने कृषी संबंधी तीन विधेयके संसदेत बहुमताचे जोरावर कुठलीही चर्चा न करता पास करून देशातील शेतकऱ्यांना भांडवली कंपन्यांच्या दावणीला बांधण्याचे काम केले आहे. या कायद्याने कृषी उत्पन्न बाजार समिती मोडकळीस येणार असून शेतकऱ्यांच्या पिकांना मिळणारा हमी भाव संपुष्टात येणार आहे. सर्व धान्य, डाळी, तेलबिया, कांदा, बटाटा या वस्तू अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून काढले जात आहे. सरकारने मोठ्या कृषी उद्योगांना खुश करण्यासाठी केवळ विरोधकांनाच नाही तर त्यांच्या मित्र पक्षाशीही चर्चा न करता हा कायदा मंजूर करून घेतला, असा आरोप माकप व किसान सभेतर्फे करण्यात आला.
मोदी सरकारच्या काळात शेतकरी अधीक कर्जबाजारी झाला आहे, दर तासाला दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, ह्या कायद्याने शेती व्यवस्था मोडकळीस येऊन शेतकरी भांडवलंदारांचे गुलाम बनतील, त्यामुळे हा कायदा रद्द करावा अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड शंकरराव दानव, कुमार मोहरमपुरी, दिलीप परचाके यांनी केले असून आंदोलनात मनोज काळे, खुशाल सोयाम, रामभाऊ जिद्देवार, किसन मोहूर्ले, कवडू चांदेकर, गजानन ताकसंडे, सुधाकर सोनटक्के, ऍड विप्लव तेलतुंबडे, सुरेश शेंडे, शिवशंकर बंदूरकर, नंदू बोबडे, विवेक चरडे, किशोर आत्राम, संजय कोडापे, भास्कर भगत, दिगंबर सहारे, अरुण साळवे, व्ही आर कोळसेपाटील, आनंदराव पानघाटे आदी हजर होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)