वणी उपविभागात मोठ्या प्रमाणात गौण खनिजांची चोरी

रेती, गिट्टी, मुरूम, डोलोमाईट, लाईमस्टोनची विना परवाना वाहतूक.

0

जितेंद्र कोठारी, वणी: वणी उपविभागात बहुमूल्य गौण खनिजांची राजरोसपणे चोरी सुरू आहे. तस्कर रेती, मुरूम व दगडाचे अवैध उत्खनन करून विना परवाना वाहतूक करीत असल्याची माहिती आहे.  गौण खनिज उत्खनन व वाहतूक कायदा तसेच प्रदूषण व पर्यावरण नियमांना धाब्यावर बसवून हे केले जात आहेत. त्यामुळे शासनाचा महसूल तर बुडत आहे सोबतच पर्यावरणाचा देखील ऱ्हास होत आहे.

महसूल विभाग, खनिकर्म विभाग, वनविभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ व स्थानिक पोलीस विभागाचे दुर्लक्ष तसेच राजकीय पाठबळ असल्यामुळे खनिज माफिया गब्बर झालेत. मागील एका वर्षापासून वणीविभागात रेती तस्करीचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावले आहे. रेती तस्करांसह संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीसुद्दा या व्यवसायातून अर्थपूर्ण लाभ होत असल्याची चर्चा आहे.

घुग्गूस, वरोरा, भद्रावती, वणी, मोहदा, मारेगाव, मुकुटबन, मांगली, पाटण, माथार्जून येथील खनिज तस्करांनी रेती व मुरूमाचा अमाप उपसा करून नदी, नाले व शेतजमीन अक्षरशः पोखरलेत. कोरोना काळात प्रशासन कोरोना निर्मूलानाच्या कामात व्यस्त असल्याचा गैरफायदा घेऊन खनिज तस्करांनी उच्छाद मांडले आहेत. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनीसुद्दा कोरोना कामात व्यस्त असल्याचे कारण पुढे करून जणू चोरट्यांना मोकळीकच दिली आहे.

वणी तालुक्यातील मोहदा व मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथील दगड खाणी व क्रशरचालकांनी तर खनिकर्म विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांना तिलांजली देऊन उत्खनन सुरू केले आहे. मोहदा व नरसाळा येथून दर दिवशी शेकडो ट्रक गिट्टी, डस्ट, मुरूम विना परवाना (रॉयल्टी) वणी, मुकुटबन, राळेगाव, पांढरकवडा, कोरपना, घुग्गुस, गडचांदूर, चंद्रपूर, जिवती, राजुरा, ब्रह्मपुरी, गडचिरोली येथे वाहतूक केली जाते. वणी उपविभागातील वर्धा नदी, पैनगंगा नदी, विदर्भ नदीच्या रेतीसह मूल, सिरोंचा व छत्तीसगड येथून रेतीचे ट्रक भरदिवसा वाहतूक करीत आहेत.

विभागात अनेक ठिकाणी मुरूमाच्या अवैध खाणी सुरू करण्यात आल्यात. वणी तालुक्यातील घोन्सा, मारेगांव तालुक्यातील नरसाळा आणि झरी तालुक्यातील गणेशपूर येथे मुरूमाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन व वाहतूक केली जाते. नुकतेच झरीचे नायब तहसीलदार यांनी अवैधरीत्या विना परवाना मुरूम वाहतूक करणारे तीन ट्रक्स पकडलेत. विशेष म्हणजे खाजगी कामांसह शासकीय कामांवरही अवैध रेती व मुरूमाचा वापर होत आहे.

महाराष्ट्र गौण खनिज अधिनियम (विकास व विनिमय) नियम, 2013 व वेळोवेळी केलेल्या सुधारणांनुसार जिल्हाधिकारी, खनिकर्म विभाग आणि महसूल खात्याला गैरकायदेशीर खनिज उत्खनन व चोरी रोखण्याकरिता अनेक अधिकार प्रदान केलेले आहेत. याशिवाय पोलीस व ग्रामपंचायतींनासुद्दा आपल्या क्षेत्रात खनिज चोरींवर आळा घालण्यासाठी अधिकार प्रदान करण्यात आलेत. गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरांवर समिती गठीत करण्यात आल्यात. एवढी यंत्रणा कार्यरत असतानादेखील रेती, मुरूमतस्कर बिनधास्त तस्करी कसे करतात? हे कोडंच आहे !

कुठे कुठे. काय.. काय ?
वणी तालुका : दगड, मुरूम, रेती, कोळसा,
मारेगांव तालुका: दगड, रेती, मुरूम
झरी तालुका: रेती, मुरूम, डोलोमाईट, लाईमस्टोन, कोळसा

राजकारणातले लोक झालेत ठेकेदार व रेती व्यावसायिक
विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते बांधकाम व खनिज तस्करीच्या व्यवसायात गुंतलेत. अवैध रेती, मुरूम वाहतूक करताना एखादं वाहन पकडलं की, संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाहन सोडण्याकरिता ‘त्या’ पक्षाचे नेते फोन करून ‘धमकीवजा’ विनंती करतात. काही प्रकरणात किरकोळ दंड आकारून वाहन सोडले जाते. तर काही वाहनं परस्पर तडजोड करूनही सोडली जातात.

राज्य सरकारने मागील तीन वर्षांपासून रेतीघाटांचे लिलाव केले नाहीत. तत्कालीन भाजप-शिवसेना सरकार व विद्यमान राज्यसरकारचे काही लोकनेते, कार्यकर्ते व पदाधिकारी गौण खनिज तस्करीच्या व्यवसायात गुंतले आहेत. या व्यवसायातून त्यांना लाभ होत आहे.

राजू उंबरकर : प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना

००००००००००००००००००००

आम्ही कारवाई करीत आहोत

वणी उपविभागीय कार्यालय अंतर्गत वणी आणि मारेगांव तालूका आहे. वणी येथे तहसीलदाराचे पद रिक्त आहे. एका नायब तहसीलदाराकडे नगर परिषद मुख्याधिकारीचा प्रभार आहे. विना परवाना रेती व मुरूम वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आम्ही कारवाई करीत आहोत. सीमेलगत असलेल्या छत्तीसगड येथून येणाऱ्या रेतीची रॉयल्टी असल्यामुळे आम्ही कारवाई करू शकत नाही. तालुक्यात गौण खनिज तस्करी काही प्रमाणात होत असेल. आमच्याकडे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.
डॉ. शरद जावळे उपविभागीय अधिकारी, वणी

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.