मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते

नरसाळा येथील शेतकऱ्याची आत्महत्या

0

नागेश रायपुरे, मारेगाव: मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. सुरेश भटांच्या या ओळींतील दाहकता मारेगाव तालुक्यात पुन्हा अनुभवायला आली. मंगळवार 29 सप्टेंबर रोजी नरसाळा येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही खळबळजनक घटना सकाळी 10 वाजता दरम्यान उघडकीस आली. भानुदास शंकर खाडे (50) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.

तालुक्यात आत्महत्येचे सत्र सतत सुरूच आहे. त्यात आज पुन्हा ही आत्महत्या जबर धक्का देणारीच आहे. प्राप्त माहितीनुसार मृतक भानुदास खाडे यांच्याकडे नरसाळा येथे 5 एकर शेतजमीन होती. त्यांच्यावर बॅंकेचे व खाजगी कर्ज असल्याचे बोलले जाते. ते कर्जबाजारी असल्याने नेहमी आर्थिक विवंचनेत राहत असल्याचेही बोलले जाते.

नरसाळा येथील तलाव परिसरात भानुदास यांचे शेत होते. अशातच मंगळवारी सकाळी 10 वाजता दरम्यान स्वतःच्या शेतातच भानुदास यांचा मृतदेह एका पळसाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतकाच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, वडील असा मोठा आप्तपरिवर आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.