नियम धाब्यावर बसवून रिलायन्सचे सुपर मार्केट सुरू
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, रात्री 9 पर्यंत बाजार सुरू
जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील राम शेवाळकर परिसरमध्ये नुकतेच रिलायन्स सुपर मार्केट उघडण्यात आले. कोविडमुळे सुपर मार्केटला सशर्त व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र या सुपर मार्केटमध्ये सर्व नियम धाब्यावर बसवून वणीकरांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. यात सोशल डिस्टन्सिंगचा तर फज्जा उडत आहे सोबतच दिलेल्या वेळेपेक्षा 2 तास अधिक हे मार्केट सुरू ठेवले जात आहे. 3-4 दिवसांपासून सुजाण वणीकर याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलत आहेत. मात्र प्रशासनाचे अद्यापही याकडे लक्ष गेले नाही हे विशेष.
सुपर बाजारच्या प्रवेशद्वारवर इंग्रजी भाषेत “कोविड-19 मुळे फक्त 25 ग्राहक आतमध्ये राहण्याची परवानगी” असा बोर्ड लावून आहे. प्रत्यक्षात सुपर बाजारच्या अंदाजे 50 कर्मचाऱ्यांनासह 300 ते 400 ग्राहक बाजाराच्या दोन्ही माळ्यावर एकाच वेळी खरेदी करताना निदर्शनास आले आहे. तर अंदाजे 100 ग्राहक आत जाण्याच्या प्रतीक्षेत बाहेर रांगेत उभे होते. विशेष म्हणजे कोरोनाचा धोका पत्करून ग्राहक आपल्या लहान लहान मुलाबाळांना एवढी गर्दीच्या ठिकाणी सोबत नेत आहे.
रात्री 9 वाजेपर्यंत सुपर मार्केट सुरू
लॉकडाउन कायदा व जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशान्वये शहरातील सर्व व्यावसायिक सायंकाळी 7 वाजता आपले प्रतिष्ठान बंद करीत आहे. मात्र रिलायन्स सुपर बाजार व काही दुकाने रात्री 9 वाजेपर्यंत सुरू ठेवत आहे. त्यामुळे प्रशासनाला लॉकडाउनच्या मार्गदर्शक तत्वांचा विसर पडला की काय ? लॉकडाउन कायद्याचा बडगा फक्त लहान व्यावसायिक व फेरीवाल्यांसाठी आहे का ? असा प्रश्न येथील व्यापारी विचारत आहे.
बुधवारी 30 सप्टेंबर रोजी या सुपर मार्केटचे उद्घाटन झाले. मात्र पहिल्या दिवसांपासूनच सुपर बाजारच्या व्यवस्थापनाने वणीकरांच्या जिवापेक्षा धंद्याला अधिक महत्त्व देत सर्व नियम धाब्यावर बसवले. पहिल्या दिवसांपासून 7 वाजताचा वेळ असतानाही 9 वाजेपर्यंत प्रतिष्ठान सुरू ठेवले आहे. याला अऩेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचा फोडली. कोरोना नियंत्रण व लॉक डाउन नियमांची अंमलबजावणी करीता महसूल, पोलीस विभाग व नगर परिषदचे एक संयुक्त पथक तयार करण्यात आले आहे. परन्तु मागील एका महिन्यापासून पथकाने एकही दंडात्मक कारवाई केलेली नाही.
नियमांचे भंग करणा-यांवर कार्यवाही:
कोविड-19 च्या अनुषंगाने लागू करण्यात आलेले नियम सर्वांसाठी सारखे आहे. रिलायन्स सुपर बाजार व काही दुकाने जर नियम मोडून वेळेनंतर सुरू राहत असेल तर आम्ही आज त्यांच्यावर कारवाई करणार.
: वैभव जाधव, ठाणेदार पो.स्टे. वणीनगरपालिका कार्यवाही करणार: रामगुंडे
नगर परिषद पथकातील बहुतांश कर्मचारी आणि 4 अभियंता कोरोना संक्रमित आहे. दुसरे पथक तयार करून आम्ही शक्यतो कारवाया करीत आहो. कोरोना नियंत्रण पथकाचे वाहन शहरात गस्त घालत आहे. सुपर बाजार व इतर काही दुकाने नियमांचे उल्लंघन करीत असेल तर आम्ही आज त्यांच्या विरुद्द फौजदारी स्वरूपाची कारवाई करणार.
: महेश रामगुंडे, प्रभारी मुख्याधिकारी, नगर परिषद वणी
गेल्या काही दिवसांपासून वणीत अचानक कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. तालुक्यात अचानक मृत्यूदर वाढला आहे. यात वृद्धांचा समावेश अधिक आहेत. मॉल, सुपर बाजार या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती लक्षात घेऊन प्रशासनाने यासाठी सुपरबाजार आणि मॉलसाठी काही मार्गदर्शनक तत्वे जाहीर केली आहे. मात्र रिलायन्सच्या सुपर बाजारमध्ये या नियमांचे सर्रास उल्लंघण करून वणीकरांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन याकडे वणीकरांनी लक्ष देणे गरजेचे आहे. शिवाय यावर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे आहे अशी अपेक्षा वणीकर करीत आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)