वणी बहुगुणी इम्पॅक्ट: ठिक 7 वाजता रिलायन्स सुपर मार्केटचे शटर डाउन
● नगर परिषद व पोलिसांचे गस्ती पथक रस्त्यावर
जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील नव्याने सुरू झालेले रिलायन्स सुपर मार्केट व इतर काही दुकाने सात वाजता नंतरही सुरू राहत असल्याबाबत सोमवारी ‘वणी बहुगुणी’ने बातमी प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले. सुपर बाजार व्यवस्थापनाने सायंकाळी सहा वाजताच प्रवेशद्वारचे शटर बंद केले. तर आत असलेल्या ग्राहकांना समान देऊन ठीक 7 वाजता बाजारचे सर्व शटर डाउन करण्यात आले.
दिनांक 30 सप्टेंबर रोजी वणीतील राम शेवाळकर परिसर येथे रिलायन्सचे सुपर मार्केट सुरू करण्यात आले होते. विविध स्किममुळे तिथे ग्राहकांची एकच झुंबड उडाली होती. मात्र यात सोशल डिस्टन्सिंगचे नियम तसेच शासनाने दिलेली मार्गदर्शक तत्वे याचा फज्जा उडाला होता. शिवाय संध्याकाळी 7 वाजेपर्यंत परवानगी असताना रात्री 9 पर्यंत मार्केट सुरू ठेवले जात होते. याबाबत सोशल मीडियावरून टीकेची झोड उठवण्यात आली होती.
सोमवारी ‘वणी बहुगुणी’ने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर प्रशासन खळबळून जागे झाले. याबाबत अधिका-यांनी संध्याकाळी भेट दिल्याचीही माहिती मिळाली आहे. अखेर संध्या 6 वाजता रिलायन्सच्या व्यवस्थापनाने मुख्य गेटचे शटर बंद करत केवळ आत असलेले ग्राहक केले. तर ठिक 7 च्या ठोक्याला रिलायन्सचे सर्व शटर डाऊन करण्यात आले.
मार्केट वेळेत बंद पण सोशल डिस्टिन्सिंगचे काय?
आज रिलायन्सचे सुपर मार्केट ठिक 7 वाजता बंद करण्यात आले तरी शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार एका वेळी केवळ 25 ग्राहकांना सोडण्याची मुभा आहे. जेवढे लोक बाहेर निघतात तेवढेच लोक त्यानंतर आता सोडले जातात. मात्र हा नियमही येथे धाब्यावर बसवला जात आहे. येथे 200 ते 300 ग्राहक एकाच वेळी आत असल्याचे निदर्शनास आले आहे. मार्केट सुरू झाल्यापासून 7 ऐवजी रात्री 9 वाजता मार्केट बंद केले जात होते. अखेर पाच दिवसानंतर रिलायन्स व्यवस्थापनाने वेळेत शटर डाऊन केले. मात्र आता 25 लोकांच्या मर्यादेबाबत प्रशासनाने शहानिशा करणे गरजेचे आहे.
‘वणी बहुगुणी’चा दणका
वणी बहुगुणीने सोशल डिस्टन्सिंग आणि संध्याकाळी 7 नंतरही शहरातील अनेक दुकाने सुरु असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. आज वणी नगर परिषदचे प्रभारी मुख्याधिकारी महेश रामगुंडेच्या नेतृत्वात कोरोना नियंत्रण पथक सायंकाळ पासून शहरात फिरत होते. तर दुसरीकडे पोलीस वाहन सायरन वाजवीत गस्त करताना दिसत होते. मोठे व्यावसायिक मनमानी कारभार करत असल्याच्या तक्रारी होत्या. छोट्या व्यावसायिकांना वेगळा न्याय व मोठ्या व्यावसायिकांना वेगळा न्याय असा आरोप देखील केला जात होता. अखेर प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याने छोटे व्यावसायिक व फेरीवाल्यांना न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. याशिवाय बातमी प्रकाशित होताच अनेक वाचकांनी महत्त्वाचा विषय मांडल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)