सही खरी, शिक्का खरा, तरी का झाला घोळ!
ड्रायव्हिंग लायसन्स शिबिराच्या खोट्या पोस्टमुळे युवकांची गर्दी
जितेंद्र कोठारी, वणी: कॉलेजच्या लेटरहेडवर सही-शिक्क्यानिशी ड्रायव्हिंग लायसन्स शिबिराच्या आयोजनाची सूचना होती. ती कॉपी सोशल मीडियावरून खूप व्हायरल झाली. त्यावरील सही खरी होती. शिक्काही खरा होता. नेमका काय प्रकार झाला हे पोलिसांच्या आणि कॉलेज प्रशासनाच्या लक्षात आलं.
कुणीतरी त्या सूचनेवर एडिटिंग करून ती व्हायरल केली. मात्र बाहेरगावांहून येणाऱ्या आणि गावातल्या विद्यार्थ्यांनाही याचा नाहक फटका बसला. शनिवारी ड्रायव्हिंग लायसन्स शिबिराच्या खोट्या पोस्टमुळे विद्यार्थ्यांची गर्दी झाली. सुदैवाने त्यांची आर्थिक फसवणूक झाली नाही.
व्हाट्सप आणि इतर सोशल मीडियावर आलेल्या पोस्ट आणि मॅसेजचा कोणताही सारासार विचार न करता फारवर्ड केल्या जात आहे. अनेकदा पोस्ट खोटी व द्वेष् निर्माण करणारी असल्यामुळे इतर नागरिकांना तसेच प्रशासनाला त्रास सहन करावा लागतं.
अशाच एका खोट्या मॅसेजमुळे शनिवार 10 ऑक्टोबर रोजी वणी येथे वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) काढण्यास इच्छुक युवकांची गर्दी झाली. नंतर व्हाट्सपवर आलेली पोस्ट खोटी असल्याचे समजल्यानंतर इच्छूक उमेदवारांचा हिरमोड झाला. आणि ते आल्यापावली आपापल्या घराकडे निघालेत.
वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या लेटरहेडवर असलेले एक सूचनापत्र मागील आठवड्यापासून व्हाट्सप आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्या पत्रानुसार लोकमान्य टिळक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी 201 रुपयांच्या सवलतीच्या दरात टू व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याकरिता शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
स्थानिक वाहतूक शाखा नियंत्रण कार्यालयात दि.10.10.2020 रोजी शिबिर असल्याचे त्या पत्रावर नमूद करण्यात आले होते. व्हाट्सएपवर व्हायरल पत्राची खातरजमा न करता महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी शनिवारी सकाळपासून वरोरा रोडवरील लो. टिळक महाविद्यालयाच्या गेटसमोर जमा झालेत. लो. टिळक महाविद्यालयात प्रशासनाने असे कोणत्याही शिबिराचे आयोजन करण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले.
काही विद्यार्थी थेट वाहतूक नियंत्रण शाखेत पोहचले. मात्र वाहतूक विभागाकडूनही दुचाकी परवान्यासाठी कोणत्याही शिबिराचे आयोजन करण्यात आले नसल्याची बाब उघड झाली. व्हायरल झालेल्या पत्राची पोलिसांकडून बारकाईने तपासणी केल्यानंतर सत्य समोर आले.
स्थानिक वाहतूक शाखा व लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी जानेवारी 2020 मध्ये दुचाकी वाहनचालक परवाना काढण्याचे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
मात्र कोणीतरी खोडसाळ प्रवृत्तीच्या व्यक्तीने नऊ महिन्यानंतर त्या सूचनापत्राच्या तारखेमध्ये बदल करून ते पत्र व्हाट्सएपवर व्हायरल केलं. त्या खोट्या पत्रावर विश्वास ठेवून वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील शेकडो युवक 201 रुपयांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याकरिता शनिवारी वणीत पोहचलेत. अखेर व्हायरल झालेलं ते पत्र खोटं असल्याचं समजल्यानंतर कोणतीही तक्रार न करता विद्यार्थी परत घरी गेलेत.
सोशल मीडियावरील खोट्या मॅसेज पासून सावध राहा ..
हल्ली व्हाट्सअप आणि इतर सोशल मीडियावर खोटी, बनावट, फसवणूक करणाऱ्या आणि अफवा पसरविणाऱ्या अनेक पोस्ट व्हायरल होतात. आलेले मॅसेज व पोस्ट फॉरवर्ड करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासून घ्या. सवलतीच्या दरात किंवा मोफत वस्तू मिळत असल्याच्या मेसेजवर अजिबात विश्वास ठेवू नये. व्हाट्सएप ग्रुप ऍडमिननेसुद्दा याबाबत काळजी घ्यावी.
नंदकुमार आयरे
सहायक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, पो.स्टे., वणी
\
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)