जब्बार चीनी,वणी: सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत तालुक्यातील रास्त भाव दुकानांमधील ‘ई – पॉस’ मशीन दोन दिवसांपासून बंद आहे. जणू ती ‘नापास’ झाली आहे. त्यामुळे धान्य वितरणात अडथळा निर्माण झाला आहे. तालुक्यातील गरीब शिधापत्रिकाधारकांना रास्त भावातील धान्याचे वितरण करण्याची प्रक्रिया रखडली आहे .
ऑक्टोबर महिना सुरू झाल्यानंतर स्वस्त धान्य दुकानदारांनी मालाची उचल करून लाभार्थ्यांना धान्य वाटपास सुरूवात केली. गेल्या दोन दिवसांपासून ई-पॉस मशीनचे सर्वर डाऊन झाल्यामुळे राशन वितरणाचे काम ठप्प आहे. आपली रोज मजुरी बुडवून दिवसभर दुकानासमोर गरीब लाभार्थ्यांचे हाल होत आहेत.
स्वस्त धान्य दुकानामार्फत होणाऱ्या रेशन धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता यावी या उद्देशाने ई-पॉस या बायोमेट्रिक प्रणालीचा वापर राज्यभरात सुरू आहे. परंतु तालुक्यातील ई-पॉस मशीनचे सर्व्हर वारंवार डाऊन होत आहे. तसेच स्लो नेटवर्कमुळे लिंक फेल होऊन रेशन वितरणात अडचणी येत आहेत. परिणामी लाभार्थ्यांसह स्वस्त धान्य दुकानदारही त्रस्त झाले आहेत.
अनेकदा तांत्रिक दोषामुळे लाभार्थ्यांना धान्य वितरणात अडचणी येतात. बऱ्याच ठिकाणी राशन दुकानदार व लाभार्थ्यांमध्ये किरकोळ वाद होत आहेत. गरीब कुटुंबांना पुरेसे अन्न मिळावे, त्यांची उपासमार होऊ नये यासाठी शासनाने अशा गरीब व सर्वसामान्य कुटुंबासाठी स्वस्त दरात राशन उपलब्ध करून देण्याची योजना अंमलात आणली.
ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे धान्य वितरणाचे काम जेवढ्या गतीने व्हायला पाहिजे, तसे होताना दिसून येत नाही.
परिणामी स्वस्त धान्य दुकानदारांचाही बराच वेळ जात आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सदर समस्या मार्गी लावावी, अशी मागणी दुकानदारांसह धान्य उचलणाऱ्या लाभार्थ्यांनी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे ग्राहक व दुकानदारांकडून पुरवठा विभागाला यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्यात. ई ई-पास मशीनबाबतच्या तांत्रिक समस्या मार्गी लावण्यात आल्या नाहीत. धान्य वितरण व्यवस्था अधूनमधून बंद पडत आहे. बायोमेट्रिक प्रणालीच्या वापरात सुरूवाती पासूनच अडचणी येत आहे.
काय आणि कशासाठी आहे ई-पॉस मशीन
तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानात पॉइंट ऑफ सेल म्हणजे ई-पॉस मशीन देण्यात आल्यात. मात्र सर्वर डाउन असल्याने समस्या उत्पन्न होत आहे. ई-पॉस मशीनशिवाय राशन वाटपाचे शासनाचे आदेश नसल्याने हीच प्रणाली दुरस्त केली जात आहे.
धान्याचा काळाबाजार बंद करण्यासाठी ही मशीन आली. या मशीनवर बोटाचा ठसा द्यावा लागतो. त्यामुळे धान्य उचलणाऱ्याची लगेच नोंद होते. ज्याप्रमाणे बायोमेट्रिक मशीनद्वारे हजेरी लावतात, तसंच हे तंत्र आहे. पूर्वी धान्य उचलणाऱ्यांची नोंद रजिस्टरवर लिहून घेतली जायची. तीच आला ईलेक्ट्रॉनिक पद्धतीने होते. याचा रेकॉर्डही कम्प्युटराईज्ड मेंटेन होतो.
ओंकार पडोळे, अन्न व पुरवठा निरीक्षक
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)