7/12 मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक

कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस नोंदणी सुरू

0

विलास ताजने, वणी: चालू हंगामात शासकीय हमी भावाने कापूस खरेदी करण्यासाठी आज दि. 14 ऑक्टोबर बुधवार पासून वणी आणि शिंदोला बाजार समितीत नोदणी सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी गर्दी झाली होती. परिणामी वणी बाजार समिती कार्यालयातून बऱ्याच शेतकऱ्यांना नोंदणी टोकन मिळाले नाही. केवळ कागदपत्रे गोळा करण्यात आली. शिंदोला येथे जवळपास चारशे शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली. तलाठी कार्यालयात गर्दीमुळे शेतकऱ्यांची सात बारा मिळविण्यासाठी दमछाक होत आहे.

वणी तालुक्यातील वणी आणि शिंदोला बाजार समितीत आज नोंदणीचा पहिला दिवस होता. मात्र पहिल्याच दिवशी दोन्ही ठिकाणी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे बाजार समिती कर्मचाऱ्यांची काही काळ त्रेधातिरपीट उडाली होती. कापूस खरेदी नोंदणी करण्यासाठी चालू हंगामाचा कापूस पीक पेरा असलेला 7/12, बँक पास बुक झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स आवश्यक आहे. त्यामुळे सातबारा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना वणीत येरझारा माराव्या लागत आहे.

तलाठयांकडे येऊनही एका दिवशी सातबारा मिळणं कठीण झालं आहे. यात शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा खर्च होतो. शेतकऱ्यांना शेतातील कामे टाकून तलाठाच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. वास्तविक पाहता शेतकऱ्यांना गावातच कागदपत्रे मिळणे अपेक्षित आहे. मात्र तलाठी स्थानिक ठिकाणी राहत नसल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर बाबीकडे लक्ष देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.