मेंढोलीत हाहाकार…! अनेकांचे टीव्ही, फॅन, फ्रीज जळाले

इलेक्ट्रिसिटीचा 'हाय व्होल्टेज' ड्रामा, ग्राहकांचे नुकसान

0

विलास ताजने, वणी: अचानक ‘हाय व्होल्टेज’चा वीजपुरवठा झाल्याने अनेकांच्या घरातील टीव्ही, फ्रीज यासारखे उपकरणे जळून खाक झालीत. सदर घटना मंगळवारी रात्री मेंढोली येथे घडली. या घटनेत वीज ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. परिणामी ग्राहकांमधून वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार मेंढोली हे गाव शिरपूर वीज वितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रात येते. दि.13 ऑक्टोबर मंगळवारी रात्री 10 वाजताच्या दरम्यान गावातील घरगुती वीज पुरवठा अचानक हाय व्होल्टेजने झाला. साधारणतः यावेळी घरगुती उपकरणे सुरू राहतात. त्यामुळे अनेकांच्या घरातील टिव्ही, फ्रीज, फॅन, बल्ब जळून निकामी झाली.

दीपक बलकी यांच्या घरातील फ्रीज, आरओ, फॅन, पाच बल्ब आदी साहित्य निकामी झाले. देविदास ढवस यांच्याकडील दोन कुलर, तीन एलईडी बल्ब, पंढरी ताजने यांच्या घरातील टिव्ही, एलईडी बल्ब, अशोक कावडे, दिलीप कावडे यांच्याकडील फॅन, एलईडी बल्ब यासह बहुतांश ग्राहकांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक झाले आहे. परिणामी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. संबंधितांनी नुकसान भरपाई देण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.

मेंढोली गावात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, कमी – उच्च दाबाचा पुरवठा होणे असे प्रकार नित्याचेच झाले आहे. पावसाळ्याचे दिवस असून देखील अनेकदा विजेअभावी रात्र अंधारात काढावी लागते. शिरपूर वीज वितरण कंपनी कार्यालयात निवेदन सादर केले आहेत. मात्र ग्राहकांच्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.

नुकसान भरपाई द्या: मेंढोलीवासी
‘अतीउच्च दाबामुळे माझ्या घरातील फ्रीज, आरओ, फॅन, पाच एलईडी बल्ब, इत्यादी उपकरणं जळाली. परिणामी माझे सुमारे तीस हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याची नुकसान भरपाई मिळायला हवी.’
– दीपक बलकी, शेतकरी

‘कधीकधी वीजपुरवठा खंडित होतो. कधीकधी कमी- उच्च दाबाचा वीजपुरवठा होतो. या घटनेत माझ्या घरातील एलईडी टीव्ही जळाला.यात माझे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहेत. शिरपूर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेणे आवश्यक आहे.’
– पंढरी ताजने, शेतकरी

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.