घटस्थापना करण्याची नेमकी वेळ आणि विधी!

नवरात्री उत्सवाला आरंभ, ह्या दिवशी कराल ह्या देवीची पूजा

0

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: शके १९४२ शार्वरी संवत्सर अर्थात शनिवार दि,१७ऑक्टोबर २०२०पासून नवरात्रौत्सव सुरू होत आहे. या वर्षी अधिकमास आला. त्यामुळे पितृ पंधरवड्यापासून एक महिना उशिरा सुरू होणारे नवरात्र यंदा एका महिन्याने लेट झाले.

अश्विन शुद्ध प्रतिपदेला शनिवारी घटस्थापना होत आहे. शनिवारी सूर्योदयापासून रात्री ९ वाजून ०७ मिनिटांपर्यंत प्रतिपदा आहे. यंदा घटस्थापना सूर्याेदयापासूनच करता येते. तरीही ११ वाजून २ मिनिटांनंतर सर्वोत्तम वेळ समजावी. असे नागपूर येथील ख्यातनाम ज्योतिर्विद किरण काटपाताळ ह्यांनी ‘वणी बहुगुणी’शी बोलताना सांगितले.

प्रत्येक हिंदू समाजात घटस्थापना अनन्य महत्वाची आहे. कुळाचार आणि चालीरीतीप्रमाणे हे नवरात्र साजरे होतात. अखंड दीप, घटस्थापना, देवीचे आव्हान दुर्गासप्तशतीचे पाठ करावे, श्रीसूक्त,म्हणावे. घटस्थापनेच्या वेळी यंदा रक्तवर्ण लाल रंगाचे वस्त्र देवीला अर्पण करावे.

ह्याच दिवशी काही समाजात व्यंकटेश म्हणजेच श्रीविष्णूचेदेखील नवरात्र असतात. व्यंकटेशाला पवमान अभिषेक करून घट मांडला जातो. रोज पवमान, पुरुषसुक्त अभिषेक करतात.

वर्षात चार प्रमुख नवरात्र असतात

शक्तीची उपासना करणारे शाक्त. विष्णूची उपासना करणारे वैष्णव. गणपतीची उपासना करणारे गाणपत्य. शिवाची उपासना करणारे शैव. सूर्याची उपासना करणारे सौर हे प्रमुख पंथ आहेत. विविध देवतांचेदेखील नवरात्र असतात. तर दोन गुप्त नवरात्रीही असल्याचं तज्ज्ञ मानतात. नवरात्रात शक्तीची उपासना होते. सध्या कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे शक्यतो ही आराधना घरीच करणे इष्ट.

ह्या सामग्री पूजेसाठी असाव्यात

पितळीची, तांब्याचा किंवा चांदीचा पाण्याने भरलेला कलश (गडवा) घ्यावा. एक नारळ लाल कापडात गुंडाळून घ्यावे. कुंकू आणि काही आंब्याची पानं. सुपारी, तांदूळ आणि नाणी घ्यावीत. सोबतच अन्यही काही पूजासाहित्य यात वापरतात. काही ठिकाणी ज्वारीच्या रोपांचा मांडव करतात. पानाफुलांनी सजवतात. निसर्गातील विविध घटक पूजेत असतात.

घटस्थापनेचा विधी

पूर्व आणि दक्षिण दिशेच्या मध्ये आग्नेय दिशा असते. आग्नेय दिशा पूजेसाठी उत्तम मानली जाते. ही स्वच्छ करावी. विधिवत इथे घटस्थापना करावी. कलश स्थापित करण्यासाठी मुहूर्तातच आधी श्रीगणेशाची पूजा जिथे कलशस्थापना करायची आहे तिथे एक स्वच्छ लाल कापड घाला.

नारळावर कापड गुंडाळून कुंकू किंवा चंदनाने स्वस्तिक काढा. शक्य असल्यास कलशात गंगाजल भरावं. अन्यथा उपलब्ध कोणतही शुद्ध पाणी भरावं. त्यात आंब्याची पाने, सुपारी, हळकुंड, दुर्वा आणि पैसे घाला. जर कलशाच्या वर झाकण घालायचे असेल तर झाकणात तांदुळ घाला, अन्यथा कलशात आंब्याची पाने घाला.
यानंतर कलशावर नारळ ठेवा आणि दिवा लावून पूजा करा. लक्षात ठेवा, देवीच्या मूर्तीच्या उजव्या बाजूलाच कलशस्थापना करायची असते.

ह्या दिवशी कराल ह्या देवीची पूजा

देवीच्या 9 रूपांची 9 दिवसांत साधारणत: पूजा करतात. शनिवार 17 ऑक्टोबरपासून नवरात्र सुरू होत आहे. तारखेनुसार पुढीलप्रमाणे देवीची आराधना करावी. 17- देवी शैलपुत्रीची, 18 – देवी ब्रह्मचारिणी, 19- देवी चंद्रघटा, 20- देवी कुष्मांडा, 21- देवी स्कंदमाता, 22- देवी कात्यायनी, 23- देवी कालरात्री, 24- देवी महागौरी आणि 25 ऑक्टोबर रोजी देवी सिद्धिदात्रीची पूजा होते.

 

जगदंबा सर्वांचं कल्याण करो

कोरोनाकाळात देवीची आराधना शक्यतो घरीच करावी. परिवार आणि आप्तांची काळजी घ्यावी. घटस्थापना, अखंड ज्योत लावावी. सोशल डिस्टंसिंग, मास्क, सॅनिटायझर यांसह सर्वच बाबतीत दक्षता घ्याव्यात. देवी हे शक्तीचं प्रतीक आहे. ऊर्जेचं प्रतीक आहे. स्त्री ही शक्तीचं प्रतीक मानतात. त्यांचा आजन्म सन्मान करावा.
जगावर असलेलं हे कोरोनाचं संकट टळावं. यासाठी वैज्ञानिक पातळीवरचे सर्व प्रयोग व्हावेत. हे संकट दूर व्हावे यासाठी जमल्यास प्रार्थनादेखील कराव्यात. केवळ याच काळात नव्हे, तर वर्षभर सत्कृत्यं करावीत. मनाने आणि शरीराने बळकट व्हावे. सर्वांच्याच कल्याणासाठी प्रयत्नरत राहावे. जगदंबा आपलं सर्वांचं कल्याण करो. शुभम् भवतु!

किरण काटपाताळ, ज्योतिर्विद

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

 

Leave A Reply

Your email address will not be published.