सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः श्री जैताई नवरात्रौत्सवाला शनिवारपासून आरंभ झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव साधेपणाने साजरा होणार असल्याचं मंदिर समितीने यापूर्वीच कळवलं होत. नियमात राहून घटस्थापनेचे विधी आणि पूजा यथासांग झाल्यात. देवस्थानाचे सचिव माधव सरपटवार ह्यांनी ‘वणी बहुगुणी’शी बोलताना सांगितलं.
शनिवारी पहाटे 5.30 वाजता विधिवत घटस्थापना झाली. साधुबुवा संताने यांच्या हस्ते हा विधी झाला. पौरोहित्य प्रा. प्रसन्न जोशी ह्यांनी केलं. नवरात्रीची विशेष पूजादेखील यावेळी झाली. पहिल्या दिवषी दर्शनार्थी येत होते. त्यांचं टेंपरेचर गेटवरच तपासण्यात आलं. हातांना सॅनिटाईज करण्यात आलं. ओट्या भरणाऱ्यांसाठी विशेष व्यवस्था होती. त्यांच्या ओट्या गेटवरूनच स्वीकारण्यात आल्यात.
सर्वच भक्तांना बाहेरूनच दर्शनाची विनंती समितीने केली. मंदिराचा उत्सव हा फेसबूक लाईव्ह करण्यात आला. त्यामुळे घरी बसून ऑनलाईन दर्शनाचा लाभ अनेक भाविकांनी घेतला. संध्याकाळी 6.30 वाजता आरती झाली. त्यानंतर रात्री 8 वाजता मंदिर पूर्णपणे बंद झाले.
मंदिरात नवरात्रीसाठी रोशनाई केली आहे. राजा जयस्वाल यांनी स्वखर्चाने मंदिराची फुलाची सजावट करून दिली. बाहेरील काउंटरवरून अनेकांनी मंदिराला देणग्या दिल्यात. पाराशर, बोदाडकर आणि खुसपुरे हे देवीचे निष्ठावंत भक्त होते. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक फलकही लावण्यात आला.
नवरात्रीत रोज दुर्गा सप्तशतीचा पाठ होतो. तो पहिल्या दिवशीदेखील झाला. प्रांगणात देणगी काउंटरवर देणगी दिल्यात. भक्तांनी यावेळी कोरोनाची अडचण समजून सहकार्य करावे ही विनंती देवस्थानाचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला ह्यांनी केली. सचिव माधव सरपटवार, भारती सरपटवार, मुन्ना पोद्दार, नामदेव पारखी यांनी यावेळी विशेष सेवा दिली.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)