रस्ता चुकला अन् रायफल गवसली…

वणीतील नॅशनल लेव्हलची रायफल शुटर अंजली आवारी यांची एक्सक्लुझिव मुलाखत

1
अंजली भागवत एक इंटरनॅशनल आणि दीर्घ अनुभव असलेली रायफल शुटर… त्यांच्यासोबत वणीतली नव्यानेच या क्षेत्रात आलेली दुसरी अंजली… या दोघीही कॉम्पिटिशनला उभ्या होत्या. मनावर दडपण होतं. धडधड वाढत होती. नॅशनल कॉम्पीटशन होती. इंडियन टीमच्या ट्रायलसाठी हे सिलेक्शन होतं. वणीतून कुणी मुलगी रायफल शुटींग करते हे कोणाच्याच ध्यानीमनीही नव्हतं. मग ग्लॅमरस अंजलीच्या सोबत वणीतील मध्यमवर्गीय कुटुंबातील दुसरी अंजली उभी ठाकली… आणि सुरू झाला अंजली गुलाबराव आवारीचा एक नवीन प्रवास… वणीतील नॅशनल रायफल शुटर अंजली आवारी  यांची सुप्रसिद्ध कवी, निवेदक सुनील इंदुवामन ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत खास वणी बहुगुणी.कॉमच्या वाचकांसाठी…

 

सुनील इंदुवामन ठाकरेः  तसं पाहिलं तर वणीत कुणाचा विश्वास बसणार नाही की वणीतील एक तरुणी ही नॅशनल लेव्हलची रायफल शुटर आहे. त्यामुळे हा प्रश्न मल देखील पडलाय की रायफल शुटिंगच्या क्षेत्रात तू कशी आलीस?
अंजलीः काहीतरी वेगळं करावं ही ऊर्मी अगदी लहानपणापासूनच होती. खरे पाहता हीच इच्छा मला या क्षेत्रात घेऊन आली. तसं पाहता रायफल शुटिंगसाठी राष्ट्रीय स्तरावर काम करणारी मी केवळ वणीतीलच नव्हे, तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातून पहिली मुलगी ठरले.

 

सुनीलः रायफल शुटिंगकडे तू अपघातने वळलीस हे खरंय ना?
अंजलीः होय. तसंच काहीतरी झालं. मी रस्ता चुकले आणि मला यशाचा महामार्ग मिळाला. नागपूरला असताना मी एक व्याख्यान ऐकायला जात होते. जाताना मी वाट चुकले. त्याच वाटेवर मला इंदिरा गांधी रायफल शुटिंग क्लबचा बोर्ड दिसला. मला जे काहीतरी वेगळं करायचं होतं, ते ‘वेगळं’ मला इथे दिसले. मी तिथेच ठरवलं की मी रायफल शुटर होणास आणि रायफल शुटिंगला 2012 पासून सुरुवात केली. पुढे त्यात इंटरेस्ट निर्माण झाली. प्रॅक्टीस करता करता आत्मप्रेरणा आणि आत्मबळ वाढत गेले. माझ्या नव्या अॅडव्हेंचरला तिथूनच सुरुवात झाली.

 

सुनीलः रायफल शुटिंगचा पुढील प्रवास कसा सुरू झाला?
अंजलीः मी रायफल शुटिंगचं टेक्निकल प्रशिक्षण घेतलं. नियमित प्रॅक्टिसवर लक्ष केंद्रित केलं. पुढे अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागले. प्रॉपर कोचिंगच्या अभावामुळे मी इंटरनेट व विविध माध्यमातून माहिती मिळविली. पुण्यात एक वर्ष प्रॅक्टीस केली. पुढे कोच आनंद बोराडेंच्या अंडर विशेष प्रशिक्षण घेतलं. पण खरी उर्जा मिळाली ती जिल्हास्तरीय चॅम्पियनशिपमुळे. या स्पर्धेमध्ये मला पहिलं गोल्ड मेडल मिळालं. त्यानंतर उत्साह वाढला. आत्मविश्वास वाढला की मीही या क्षेत्रात पुढे जाऊ शकते. माझे वडील गुलाबराव आवारी, आई अनुराधा आणि भाऊ घनश्याम यांचाही मला नेहमीच सपोर्ट असतो. प्रोत्साहन असते.

सुनीलः यातील काही महत्त्वाच्या अचिव्हमेंटस् सांगता येतील?
अंजलीः 2013 ला औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय चॅम्पियनशिप स्पर्धेत मी चवथ्या नंबरवर राहिले. पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे झालेल्या प्री-नॅशनल स्पर्धेत चवथ्या नंबरवर राहिले. इथून मी नॅशनल साठी क्वालिफाय झाले. 2014 मध्ये दिल्ली येथे नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये भारतीय टीमच्या ट्रायलसाठी क्वालिफाय झाले. याच वर्षी भारतीय संघातील प्रवेशासाठी ज्या विविध ट्रायल्स होतात, त्यासाठीदेखील मी पात्र झाले. पुरस्काराचं म्हटलं तर धनोजे कुणबी समाज विकास बहुउद्देषीय संस्था वणीद्वारा क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल 2017चा ‘समाजभूशण’ पुरस्कार मला मिळाला.

सुनीलः रायफल शुटिंगमध्ये विद्यापीठ स्तरावर प्रतिनिधीत्त्व केलंस, त्याबद्दल सांग

अंजलीः ही गोष्ट माझ्यासाठी फारच गौरवाची आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे रायफल शुटिंगमध्येदेखील प्रतिनिधीत्त्व करणारी मी पहिली मुलगी आहे. एवढंच नव्हे तर दिल्लीत दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर नागपूरचे प्रतिनिधीत्त्व केलं आहे.

सुनीलः रायफल शुटिंगमध्ये तुला कोणते संघर्ष जाणवलेत?
अंजलीः पहिली गोष्ट म्हणजे हा क्रीडाप्रकार कॉमन नाही. त्यामुळे तालुकास्तरावर तर याचं प्रशिक्षण जवळपास अशक्यप्राच आहे. मी नागपुरला प्रॅक्टीस करीत असतानादेखील योग्य प्रशिक्षकांचा अभाव इथे जाणवतो. एक्सपर्ट कोच मिळत नाही. अगदी पूर्ण तंत्रशुद्ध प्रशिक्षण घ्यायचं असल्यास आपल्याला पुण्या-मुंबईकडेच धाव घ्यावी लागते. त्यातल्या त्यात हा खूप खर्चिक क्रीडाप्रकार आहे. यासाठी स्पॉनर्सदेखील सहसा मिळत नाहीत. त्यामुळे आपल्यालाच ही सर्व खर्चाची तजवीज करावी लागते.

 

सुनीलः रायफल शुटिंगचे इव्हेंटस् कसे असतात?
अंजलीः ते अंतरानुसार ठरतात. 10, 25, 50 मीटर्स असे ते इव्हेंटस् असतात. 10 मीटर्स हे इंडोअरमध्ये तर बाकी आऊटडोअरमध्ये येतात.

सुनीलः सुरुवात करायला अंदाचे किती खर्च येतो?
अंजलीः मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला दीड लाख रूपयांची रायफल व 30 हजार रूपयांची कीट विकत घ्यावी लागली. हा तर अत्यावश्यक बेसिक असा खर्च आहे. आणखी इतर किरकोळ खर्चही यात येतो. इतर इक्विपमेंट देखील महाग आहेत. यासाठी स्पॉन्सर्स मिळाले तर आमच्यासारख्यांना या क्षेत्रात आणखी पुढे जाऊन आपल्या मातृभूमीचे नाव उज्ज्वल करता येईल.

सुनीलः नॅशनल लेव्हल सिलेक्शनचा तुझा अनुभव कसा होता?
अंजलीः नॅशनल लेव्हल म्हटलं की प्रचंड जिद्द, परिश्रम आणि चिकाटी लागते. त्यातही सिलेक्शन होईल काय? आपण हे करू शकू काय? अशीही शंका होती. यात सिनिअर शुटर्सही उतरतात. माझे प्रयत्न उत्तम राहिलेत. स्कोर चांगला आला. यात तीन ते चार वर्षं ट्रायल द्याव्या लागतात.

सुनीलः रायफल म्हटलं की की मनात एक भीती येते. जिवाचं काही बरंवाईट तर होणार नाही. रायफल शुटिंगमध्ये जिवाला काही धोका असतो काय?
अंजलीः आमच्यासाठी ज्या रायफल असतात, त्यांनी जिवाला धोका नाही. फक्त ती सावधगिरीने हाताळणे आवश्यक आहे. चुकून अपघात झालाच, तर जास्तीत जास्त जखमी होण्याची शक्यता असते.

सुनील: इंटरनॅशनल शुटर अंजली भागवतांची भेट झाल्यावर काय नवीन मिळालं ?
अंजलीः अंजली भागवत म्हणजे आमच्यासाठी सुपरस्टारच. पहिल्यांदा तर केवळ ऑटोग्राफ मिळाला असता तरी धन्य वगैरे वाटलं असतं. त्यांची भेट झाल्यावर त्यांनी आम्हाला सदिच्छा दिल्यात. काही बारीक-सारीक टिप्स सांगितल्या. माझ्या अनेक शंकांना त्यांनी समाधानकारक उत्तरे दिलीत. त्यादेखील अंजली आणि मीदेखील अंजली, त्यामुळे याचंही एक वेगळंच फिलिंग होतं.

सुनीलः नव्या पिढीतील मुलींना तू काय सांगू इच्छिते
अंजलीः मुली सर्वच क्षेत्रात आज आघाडीवर आहे. महिलांनी शस्त्रास्त्राने पराक्रम घडविला. राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, राणी लक्ष्मीबाई या शस्त्रविद्यांसहविविध मैदानी  खेळांत पारंगत होत्या. आजदेखील भारतीय महिला हॉकी टीम, क्रिकेट टीम या क्रीडाक्षेत्रांसह ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांत आघाडीवर आहेत. मुलींनी नाजूकच कामं करावीत, हा पायंडा मोडला पाहिजे. त्यांच्यासाठी भरारी घ्यायला मुक्त आकाश आहे. त्यांच्या पंखात असलेल्या बळाला आपली साथ द्यावी. जे जे उत्तम, उदात्त ते आपण करू शकतो आणि ते केलंच पाहिजे. हा विश्वात मनात पक्का रुजवावा.

सुनीलः तुझा बहुमुल्य वेळ देऊन वणीकरांसाठी वेगळ्या असलेल्या या विषयावर तू खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या त्यासाठी तुझं धन्यवाद….
अंजलीः वणी बहुगुणी टीमलाही खूप खूप धन्यवाद…
Leave A Reply

Your email address will not be published.