विलास ताजने, वणी: भक्तांचा भाव झाला यंदा ‘लॉक’ झाला आहे. यंदा नऊ दिवस चालणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाला 17 ऑक्टोबर शनिवारी आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात झाली. आश्विन शुद्ध दशमी 25 ऑक्टोबरपर्यंत परंपरेनुसार हा उत्सव चालणार आहे.
नवरात्राच्या दिवसात दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे देवीच्या मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी बंद आहेत. मंदिराच्या विश्वस्थांशिवाय अन्य कोणालाही मंदिर परिसरात प्रवेशाची परवानगी नाही.
शासनाच्या सूचनांचे पालन करण्यासाठी परिसरात पोलिसांचा पहारा लावला आहे. परिणामी वणी परिसरातील सर्वच देवीच्या मंदिरात भाविकांचा शुकशुकाट दिसत आहे.
वणी तालुक्यात वणी, वरझडी, गोडगाव, चिखली, येनक, वनोजादेवी आदी ठिकाणी देवीची मंदिरं आहेत. वणीची जैताई माता, वरझडीची भवानी माता, वनोजाची जगदंबा माता अशा विविध नावांनी मातेच्या मंदिरांची ओळख आहे. नवरात्रात या सर्व मंदिरात देवीचे भक्त मंदिरात जाऊन दर्शन घेतात. महिला मंडळी नऊ दिवस विविध देवीच्या मंदिरात जाऊन ओटी भरतात. नवरात्रात सर्व मंदिरात भाविकांची वर्दळ असते.
मंदिर परिसरात पूजेचे साहित्य, ओटी साहित्य, प्रसाद अशी विविध प्रकारची दुकाने असतात. नऊ दिवस भक्तिमय आनंददायी वातावरणाचा सुगंध घराघरात दरवळत असतो. खरं पाहता नवरात्रात महिलांचा उत्साह द्विगुणित झालेला असतो.
उत्सवाच्या नऊ दिवसांच्या नऊ रंगाची ओळख स्त्रियांच्या साडी पेहरावात दिसून येते. या उत्सवानिमित्ताने मूर्तीकार, पूजा विक्री, अन्य छोटे मोठे दुकानदार, प्रवासी वाहतूकदार, गरबा, दांडिया नृत्य कलाप्रशिक्षक, मंडप डेकोरेशन, साऊंड सिस्टीम चालक यांना रोजगार उपलब्ध होतो. मात्र यंदा या सर्व धंदेवाईकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. खरेदी विक्रीतून होणारी लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)