याही संघर्षात लढली महेश्वरी लांडे
उत्सव भक्तीचा, गौरव शक्तीचा, नऊ जणी-बहुगुणी अंतर्गत खास लेख
अंजली गुलाबराव आवारी, वणी : आयुष्य म्हणजे सुखदुःखांची रेलचेल आहे. जीवनात हे सगळं येत जात राहीलच. त्यामुळे खचून न जाता नव्याने उभं राहिलं पाहिजे. लढलं पाहिजे. कोणत्याही विपरीत परिस्थितीमध्ये स्वतःला आनंदी ठेवले पाहिजे. हे ती अनुभवाने शिकत गेली. स्वतःला अंतर्बाह्य बळकट केलं.
तिच्यातील शक्ती स्वरूपाची जाण ठेवली. ती आज अनेक क्षेत्रांत यशस्वी आहे. या नवरात्रीतील ही बहुगुणी आहे, महेश्वरी लांडे आवारी. तिची ही गौरवाली कारकीर्द सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे. विद्यार्थीदशेत अधूनमधून काहीतरी लिहिणारी महेश्वरी ‘हुंडा’ हा विषय घेऊन एक पुस्तक लिहिते हे तिच्या संघर्षाचं यशच आहे.
शाळा सुरू झाली. अगदी ज्युनियर कॉलेजच्या बारावीपर्यंत शालेय वातावरण कायम होतं. शिक्षण क्षेत्रात तिला सुरुवातीपासूनच रस होता. त्यामुळे बी.एड. फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतली. त्यानंतर सलग दोन विषयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. बरं शिक्षण घेणं हा काही सोपा खेळ नव्हता माहेश्वरीसाठी. त्यासाठी तिला खूप कठीण संघर्ष करावा लागला. त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आईचं आजारपणय अत्यंत क्रिटिकल कंडिशन मध्ये माहेश्वरीची आई आजही आहे.
माहेश्वरीने महामानवांचा आदर्श सतत डोळ्यांपुढे ठेवला. क्रांतीज्योती सावित्रीआई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शिक्षणाचा संघर्ष याहीपेक्षा मोठा होता. त्या तुलनेत आपलं दुःख आपले प्रॉब्लेम्स, आपल्या संघर्ष काहीच नाही याची जाणीव ठेवली.
शिक्षणाचा प्रवास सुरूच ठेवला. आईची शारीरिक आणि मानसिक व्यथा तिच्या मनाला छळत होती. तरीही ती खंबीर राहिली. लढा थांबवायचा नाही असं ठरवलं. कॉलेजचे बरेच लेक्चर्स तिला अटेंड करणं शक्यच नव्हतं.
तिने त्यावर स्वतः परिश्रम घेतलेत. आईची परिस्थिती आजही फारशी समाधानकारक नाही. त्यानंतर माहेश्वरीचं लग्न झालं सुमित आवारी यांच्यासोबत. अत्यंत समजदार, सुस्वभावी आणि प्रत्येक क्षेत्रात सहकार्य करणारा जीवनसाथी तिला मिळाला. आयुष्याचा प्रत्येक दिवस नवीन असतो. प्रत्येक घटना नवीन असते. प्रत्येक प्रसंग नवीन असतो.
हे नावीन्य तिने नियमित जपलं. नवीन काहीतरी शिकलं पाहीजे. नवीन काहीतरी केलं पाहिजे, हा तिचा नेहमीचाच ध्यास असायचा. अट्टाहास असायचा. ज्या ज्या क्षेत्रात भरारी घेता येईल, त्या त्या क्षेत्रात ती घेण्याचा प्रयत्न तिने केला. डांस, गायन, लेखन, वाचन, हस्तकला, पाककला, भाषण, मॉडेलिंग यामध्ये माहेश्वरीला विशेष इंटरेस्ट. तो तिने जपला. तिच्या परिवाराने यासाठी तिला खूप सपोर्ट केला.
माहेश्वरी नियमित लिहिते, वाचते. ही गोष्ट सगळ्या जवळच्या लोकांना माहीत होती. तिने पुस्तक काढावं असं सगळ्यांनी सुचवलं. ते काही सोपं काम नव्हतं प्रपंचाचा व्याप नि बर्याच गोष्टी त्यामागे होत्या. तरीही एकदाच ठरलं पुस्तक काढायचं. ललित निबंध हा माझा आवडता प्रांत.
त्याचं पुस्तक काढायचं निश्चित झालं. अखेर तो दिवस उजाडला 18 डिसेंबर 2016. ‘मानसीचे रूपगंध’ हे माहेश्वरी लांडे आवारीचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं. नवा आत्मविश्वास मिळाला. नवं बळ मिळालं. नवी प्रेरणा मिळाली.
तसं माहेश्वरीचं मूळ गाव राजुरा तालुक्यातील सास्ती. या गावात दत्तजयंतीला भागवत सप्ताह व्हायचा या सप्ताहात काहीतरी वेगळे प्रयोग करायचं तिने ठरवलं. गावकऱ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, प्रश्नोत्तर स्पर्धा घेणं तिने सुरू केलं. त्यात आयोजक आणि गावकरीदेखील मदत करायचेत.
स्त्री म्हणून स्त्रियांच्या अनेक समस्या तिला चिंतन करायला भाग पाडायच्यात. त्यातही हुंड्याची समस्या खूप मोठी. या प्रश्नावर वाचा फोडायला तिने सुरुवात केली. मुळात ज्यांचा हा प्रश्न आहे त्यांना वेगळे ठेवून कसं चालेल, म्हणून वय वर्ष सात वय वर्ष 70 या सगळ्या बायकांना या कामात तिने लावलं.
माहेश्वरी खेड्यातून आलेली आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ती ठेवते. त्यांचे विचार, त्यांची ग्रामगीता सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. त्यातूनच ग्रामगीता, जीवन विकास परीक्षा याची केंद्रप्रमुख म्हणून जवळपास हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी म्हणून तिने त्यांना प्रेरित केले.
एवढेच नव्हे तर ती स्वतः ग्रामगीतेच्या पाच परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे. लग्नानंतर संसाराची जबाबदारी वाढली. परिवार शिक्षण संस्था चालवतो. तीदेखील याची सक्रिय घटक झाली. सासरे सुभाष आवारी आणि सासू शारदा आवारी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. माहेश्वरी रोज वणीहून मार्डीपर्यंत 60 किलोमीटरचा प्रवास करते. आतापर्यंतच्या संघर्षांना आलेली ही गोड फळं आहेत.
माहेश्वरी लांडे आवारी हिने अनेक संघर्षांना तोंड देत, यशाच्या नव्या वाट्या शोधल्यात. स्रियांच्या प्रश्नांसाठी ती आजही दक्ष असते. हा लढा एकटीचा नाही, हे तिला माहीत आहे. ती या लढ्यात प्रत्येक मुलीला, स्त्रिला लढवय्या म्हणून उभी करते. ती बहुगुणी आहेच. ती शक्तीस्वरूपही आहे. तिच्या या कार्याला, लढ्याला सलाम.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)