‘वन्य प्राण्यांपासून शेतक-यांना संरक्षण न दिल्यास आंदोलन तीव्र करू’
शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीनं दिला इशारा
निकेश जिलठे, वणी: जर शेतक-यांना वनविभागानं वन्य प्राण्यांपासून संरक्षण दिलं नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा ‘शेतकरी न्याय हक्क आंदोलन समिती’चे नेते देवानंद पवार यांनी दिला. शनिवारी वणी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या वणी तालुक्यातील दहा गावातील शेतक-यांनी विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसले आहेत. त्यांनी गाव तिथं उपोषण आंदोलन सुरू केलं आहे. यातील महत्त्वाची मागणी ही वन्य प्राण्यांपासून संरक्षण ही आहे. गेल्या काही दिवसांत वाघांच्या हल्ल्यात अनेकांना प्राण गमवावा लागला असून अनेकांना वाघानी गंभीर जखमी केले आहे. त्यासाठी शेतक-यांनी आक्रमक पावित्रा उचलत उपोषणाचं हत्यार उपसलं. शनिवारी या उपोषणकर्त्यांची शेतकरी न्याय हक्क आंदोलनाच्या पदाधिका-यांनी भेट घेतली.
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी किंवा शेतमजुराचा मृत्यू झाल्यास शासन आठ लाखांचा मोबदला देते. मात्र वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी कोणतीही उपाययोजना करत नाही. जीव गेल्यास आम्ही तुम्हाला आठ लाख रुपये देतो इतके पैसे तुम्ही आयुष्यभरही कमवू शकत नाही अशी उद्दाम भाषा वनअधिकारी वापरून शेतक-यांच्या जिवाला कवडीमोल ठरवत आहे. अशी टीका करत पवार यांनी वन अधिका-यांच्या भूमिकेचा देखील समाचार पत्रकार परिषदेत घेतला.
शनिवारी उपोषणकर्त्या शेतक-यांची शिरपूर येथे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी भेट घेतली. मात्र बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही त्यामुळे शेतक-यांनी आंदोलन सुरूच ठेवलं आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीचे पदाधिका-यांनी शेतक-यांची भेट धेतली. यात देवानंद पवार, माजी जिल्हा परिषद सभापती, राजेंद्र हेंडवे, माजी जिल्हा परिषद सभापती, मिलिंद धुर्वे, माजी जिल्हा परिषद सभापती आणि विजया धोटे माजी आमदार उपस्थित होते.
वणी तालुक्यातील वृक्ष तोडीमुळे जंगले विरळ झाली. परिणामी वन्यप्राण्यांचा शेतात शिरकाव वाढला. पिकांचे नुकसान होऊ लागले. वनविभागाकडे वारंवार वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी करूनही उपयोग झाला नाही. खंडित वीज पुरवठा नियमित झाला नाही. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, सततची नापिकी, सरकारचं दुर्लक्ष अशा अनेक समस्यांनी शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे विविध मागण्या घेऊन वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
वणी तालुक्यातील शिरपूर, शिंदोला शिवाराला मेंढोली, कुर्ली बीटचे जंगल लागून आहे. अतिक्रमित शेतीसाठी जंगलाची प्रचंड तोड झाली. त्यामुळे वन्यप्राण्यांचे निवासस्थान नष्ट झाली. वन्यप्राणी चारापाणी मिळविण्यासाठी शेतात शिरकाव करतात.परिणामी पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. म्हणून वन्यप्राण्यांपासून शेतमालाचे रक्षण शासनाने करावे. अन्यथा वन्यप्राण्यांना ठार मारण्याची शेतकऱ्यांना परवानगी द्यावी. अशी प्रमुख मागणी शेतक-यांनी केली आहे.