राजूर कॉलरीतील महिलांचा ग्रामपंचायतीवर हल्लाबोल
नागरी सुविधा द्या अन्यथा तीव्र आंदोलन, महिलांचा इशारा
विवेक तोटेवार, वणी: वणी नजीक असलेल्या राजूर कॉलरी येथील महिलांनी ग्रामपंचायत वार्डातील समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत ग्रामपंचायतीविरोधात एल्गार पुकारला. वार्ड क्रमांक 4 च्या महिलांनी एकत्र येत आज सोमवारी दिनांक 26 ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायतीवर धडक देत प्रशासकाला निवेदन दिले. निवेदनात त्यांनी नागरी सुविधा व घरकुलाची मागणी केली आहे. जर वार्डात नागरी सुविधा न दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशाराही महिलांनी दिला.
राजूर कॉलरी येथील वार्ड क्र. 4 हा वेकोलि, रेल्वे व चुना भट्टी क्षेत्रातील जागेत वसलेला आहे. या वार्डात बहुतांश नागरिक हे गरीब कामगार व दारिद्र्य रेषेखाली जगणारे आहेत. या लोकांनी आपल्या असलेल्या अल्प कमाईतून छोटी छोटी घरकुले उभारली आहेत. घर असल्याने राजूर ग्रापं कडून रितसर इमला कर, दिवाबत्ती कर, पाणी कर वसूल केल्या जाते,
मात्र कर भरूनही सुविधा द्यायची वेळ येते त्यावेळेस “तुम्ही कोळसा खाणी, रेल्वेच्या जागेवर असल्याने तिथे आम्ही कसलीही सुविधा, किंवा योजना देऊ शकत नाही”, असे उत्तर देऊन ग्रामपंचायत हात वरती करते असा आरोप वार्डातील महिलांनी केला आहे.
ग्रामपंचायतीच्या या धोरणामुळेच वार्डातील नागरिकांना योजनेत बसत असतानाही अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. घरकुल योजनेत स्वत:ची जागा उपलब्ध नसल्यास ग्रापंने जागा विकत घेऊन घरकुल द्यावे असा आदेश असतानाही या वार्डातील नागरिकांना घरा अभावी झोपडीत रहायला मजबूर केले आहे. असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. निवेदन देते वेळी वार्ड क्र 4 च्या माहिलांसह प्रा. अजय कंडेवार, समय्या कोंकटवर, आशा रामटेके उपस्थित होते.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)