सुशील ओझा, झरी: सध्या रुईकोट ते बोरी हायवे क्र. 135 च्या रोडचे काम सुरू असून सदर कामात काळ्या मातीचा सर्रास वापर होत असताना दिसत आहे. त्यामुळे रोडचे काम नित्कृष्ट दर्जेचे होत असल्याचा आरोप होत आहे.
रुईकोट ते बोरी असा 30 किमीचा रोड तयार होत असून सुमारे 80 कोटींचे हे काम आहे. वणी ते मुकुटबन व्हाया बोरीला जाणारा हा मुख्य मार्ग असून या मार्गावर मोठ्या प्रमाणात बस, ट्रक व कंपनीतील कोळसा ट्रक, तसेच गिट्टी, गोटा चुना व सिमेंटची जड वाहतूक होते. याच अनुषंगाने रस्त्याची क्षमतेनुसार नुसार रस्त्याचे काम होणे आवश्यक असताना इथल्या कामात काळ्या मातीचा वापर हाताना दिसून येत आहे.
रस्ता रुंदीकरणासाठी खोदकाम करण्यात आले आहे. तिथे गिट्टी व मुरूमचे प्रमाण कमी असून रोडच्या बाजूची काळी माती मोठ्या प्रमाणात टाकण्यात येत आहे. गिट्टी व मुरूम कमी व काळी माती टाकून गिट्टीवर थर दिला जात आहे.
प्रशासनाचे कामाकडे दु्र्लक्ष
रस्त्याचे काम योग्य प्रकारे होत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्याचे काम प्रशासनाचे आहे. मात्र बांधकाम विभागाचे इंजिनीयरचे याकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे. कोट्यवधीचे इस्टिमेट असलेल्या या रस्त्याकडे लोकप्रतिनिधीसह गावपुढा-यांचेही लक्ष नाही. त्यातच काही पुढारी तर या रोडच्या कामातही स्वतःला पुलाचे काम मिळावे याकरिता धावपळ करीत आहे.
सदर कामाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करावी व रोडचे काम इस्टीमेट नुसार करावी अशी मागणी जनतेकडून होत आहे.