ओबीसींची जनगणना हाच न्याय व हक्काचा मार्ग: ऍड. अंजली साळवे
जातनिहाय जनगणना कृती समितीद्वारा व्याख्यानाचे आयोजन
जब्बार चीनी, वणी: जातीनिहाय जनगणना झाल्यास ओबीसी समाज संघटित होण्याची भीती काही लोकांना भीती वाटते त्यामुळेच मूठभर उच्चभ्रू जातींच्या लोकांचा जातनिहाय जनगणनेला विरोध आहे. मात्र आता ओबीसी जागा होत असून जातीनिहाय जनगणना हाच न्याय आणि हक्काचा मुख्य मार्ग असल्याची त्याला जाणीव होत आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ऍड अंजली साळवे यांनी केले. वणी येथील धनोजे कुणबी समाज भवन येथे आयोजित ”जातनिहाय जनगणनेची आवश्यकता का?” विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. ओबीसी (व्हीजे, एनटी, एसबीसी) जातनिहाय जनगणना कृती समिती वणी द्वारा शनिवारी दिनांक 7 नोव्हेंबर रोजी ही सभा आयोजित करण्यात आली होती.
पुढे त्या म्हणाल्या की सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टीने मागासलेल्या समाजाच्या विकासासाठी लोकसंख्येनुसार आरक्षण लागू करावे लागेल. दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेचा त्यासाठी आधार घेतला जातो. मात्र सरकार ओबीसींच्या न्याय आणि हक्काच्या आड येत आहे. काही मुठभर जातीची लोक या जातनिहाय जनगणनेच्या विरोध करीत आहे.
जातनिहाय जनगणना केल्यास ओबीसी समाज संघटित होईल. सरकारला मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी लागेल. मागास वर्गाच्या आयोगाची स्थापना करण्याची मागणी करूनही आयोगाची स्थापना न केल्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींसाठी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. अशी आठवणही ऍड अंजली साळवे यांनी उपस्थितांना करून दिली.
कार्यक्रमात उपस्थित महिलांच्या वतीने ऍड अंजली साळवे यांचा सत्कार करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी कृती समितीचे अध्यक्ष प्रदीप बोनगीरवार होते. सभेचे प्रास्तविक मोहन हरडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पेचे यांनी केले तर आभार राम मुडे यांनी मानले. सभेला मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज उपस्थित होता.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)