शिंदोला ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचारात केंद्रीय मंत्र्याची उडी

प्रचार शिगेला, दाव्या- प्रतिदाव्यांनी मतदारांमध्ये संभ्रम

0

रवि धुमणे वणी: वणी तालुक्यात येत्या ७ ऑक्टोबरला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराचे काही तास शिल्लक राहिले आहे. दाव्या- प्रतिदाव्यांनी रंगात आलेल्या शिंदोला येथील प्रचारात वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह थेट केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी उडी घेतली. त्यामुळे शिंदोल्याच्या निवडणुकीला कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे.

शिंदोला येथील ग्रामपंचायत निवडणूकीत माजी सरपंच व विध्यमान पंचायत समिती सदस्य संजय निखाडे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी शेतमजूर ग्रामविकास पॅनल विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, मनसे आणि संजय देरकर गट सहभागी असलेली सर्वपक्षीय स्थानिक पुढाऱ्यांची किसान मजदूर आघाडी टक्कर देत आहे. स्थानिक विकासकामे आणि समीकरणाप्रमाणे दोन्ही बाजूंनी प्रचार शिगेला पोचवला आहे.

शिंदोला येथील विकास कामांइतकाच स्थानिकांचा कळीचा मुद्दा हा, माहूर देवस्थान कमिटीच्या जमिनीवरील मालकी हक्काच्या वादाचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील शेतकरी न्यायासाठी लढा देत आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याबाबतचे प्रकरण प्रलंबित आहेत.

मात्र नुकतेच केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शिंदोला येथील ग्रामपंचायत निवडणूक प्रचारात विरोधी पॅनलच्या लोकांनी न्यायालयात दाखल केलेली केस मागेच हरली असल्याचे सनसनाटी विधान करून सर्व उपस्थितांना धक्का दिला. तर २८ सप्टेंबरच्या सुनावणी प्रसंगी न्यायालयाने युक्तिवादाची पुढील तारीख ९ ऑक्टोबर दिल्याचे कागदपत्र शेतकरी शेतमजूर ग्रामविकास पॅनलची मंडळी दाखवत असल्याने मतदारांमध्ये कागदपत्रे खरी की, मंत्री बोलतो ते खरे, असा संभ्रम निर्माण झाला आहे.

वास्तविक शिंदोला येथील शेतजमिनीवरील माहूर देवस्थानच्या मालकी संबंधाचा वादाचा हा विषय कोण्या एका पक्षाचा किंवा पॅनलचा नाही. तो सर्व शेतकऱ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक प्रचारात याच हंसराज भैयांनी  निवडून आल्यावर शिंदोल्याच्या जमिनीचा प्रश्न सोडवू , असे जाहीर आश्वासन दिले होते. या प्रकरणाच्या निपटाऱ्यासाठी पाठपुरावा करायचे सोडून दिशाभूल करणारे विधान करून शेतकऱ्यांची उमेद घालवण्याचा निंदनीय प्रकार ग्रामपंचायतीच्या स्थानिक निवडणूकित करीत असल्याबद्दल शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.

याबाबतचा न्यायालयीन लढा उभा करणारे शिंदोल्याचे माजी सरपंच संजय निखाडे यांना केंद्रीय गृहराज्यमंत्र्याच्या विधानाबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने विचारले असता अहीर हे धादांत खोटारडे असून याबाबतची माहिती मला विचारली असती तर कागद पत्रानिशी ती दिली असती, मात्र मतांसाठी खोटे बोलून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यापेक्षा आपल्या सत्तेचा आणि पदाचा वापर करून शेतकऱ्यांचा हा प्रश्न सोडवण्यासाठी काही पावले उचलली असती तर शेतकऱ्यांचे आशीर्वाद व मते मिळाली असती. त्यात माझेही एक मत असते, अशी बोचरी प्रतिक्रिया संजय निखाडे यांनी दिली.

निखाडे यांनी सरपंच पदाच्या कार्यकाळात गावात दुभाजक रस्ता निर्माण केला. शिवेचा मारोती देवस्थानचे बांधकाम केले. शिंदोला व परिसरातील ग्रामस्थांना लग्न, इतर कार्यप्रसंगी उपयोगी सभागृहाचे बांधकाम केले. मंदिरात पाणी, वीज पुरवठा आदी सोई निर्माण केल्या. गावात दारूबंदी, स्वच्छता अभियान, क्रीडा स्पर्धा, भागवत सप्ताह, रक्तदान शिबिर, आरोग्य सेवा आदी लोकोपयोगी उपक्रम राबविले. निखाडे हे शेतकरी,शेतमजूर ग्रामविकास  पॅनलचा लढा निकराने देऊन मतदारांना केलेल्या कामाच्या पावतीच्या आधारे मत मागत आहे.

येत्या ७ तारखेला मतदार प्रत्यक्ष गावात मागील पाच वर्षात केलेल्या कामाला साथ देतात की, विरोधकांच्या केवळ पोकळ आश्वासनाला मत देतात, हे प्रत्यक्ष निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. एकूणच चिखलगावसह शिंदोल्याच्या निवडणूकीकडे वणी तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. प्रचारासाठी फेसबुक, व्हाट्सएपचा वापर केला जात आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.