नागेश रायपुरे, मारेगाव: कमी दरात सोन्याचे नाणे घेण्याचा सौदा होतो. त्यानुसार खरीददार सुमारे चार लाख रुपये घेऊन येतो. मात्र अचानक तिथे धुमस्टाईल एक बाईकस्वार येतो आणि पैशाची बॅग हिसकावून नेतो. नेमके त्याच वेळी पोलीसही गाडी घेऊन तिथे पोहोचतात. दोघांचाही पाठलाग केला जातो. त्यातील बॅग लुटणारा पोलिसांच्या हाती लागतो तर लुटला गेलेला इसम पळून जाण्यास यशस्वी होतो. मात्र नंतर त्याच्या लक्षात येतं की हा सर्व रचलेला प्लान होता. एखाद्या चित्रपटातील शोभेल असा हा सिन प्रत्यक्षात घडला आहे. या प्रकरणी आज तोतया पोलीस बनलेली एक महिला, एक पुरुष व तोतया पोलिसांच्या गाडीचा चालक अशा तिघांना मारेगाव येथून अटक केली आहे. तर बॅक हिसकवणा-या व्यक्तीला आधीच लांजी येथून अटक कऱण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की विनोद रामचंद्र इंगोले हा मुळचा आमला जिल्हा यवतमाळ येथील रहिवाशी असून सध्या तो औरंगाबाद येथे स्थायिक आहे. त्यांची माहूर तालुक्यातील लांजी येथील रहिवाशी असलेल्या आकाश दिलिप पवार (26) या तरुणाशी एक वर्षाआधी ओळख झाली होती. आकाश याने विनोद यांना लबाडी करुन लुटण्याचा प्लान केला. त्यासाठी त्याने विनोद यांना सोन्याचे नाणे कमी भावाने देणारी व्यक्ती ओळखीची असल्याचे सांगितले. त्याच्या या आमिषाला विनोद बळी पडले. विनोदने कमी दरात सोन्याची नाणी घ्यायचे ठरवले. त्यांची 3 लाख 90 हजारात डिल ठरली.
ठरल्याप्रमाणे सोमवारी 21 डिसेंबर रोजी विनोद व त्याचा भाऊ किनवट येथील दराडी रोडवरील साई मंदिर येथे दुचाकीने सौदा करण्यासाठी पोहोचले. विनोद पैशाने भरलेली बॅग खांद्यावर लटकवून त्याच्या भावासह तिथे सोन्याचे नाणे आणणा-यांची वाट बघत बसले. दरम्यान पाठिमागून एक दुचाकी चालक आला व त्याने विनोदच्या खांद्यावरची बॅग बळजबरीने हिसकवून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र या झटापटीत बॅग पळवणा-या व्यक्तीच्या तोंडावर बांधलेला रुमाल निघाला. बॅग पळवणा-या इसमाचा चेहरा दिसताच विनोद हादरून गेला. कारण तो बॅग पळवणारा इसम दुसरा तिसरा कुणीही नसून ज्याने नाण्याचा सौदा करण्यासाठी बोलावले होते तो आकाश पवारच होता.
लुटण्यासाठी रचला भन्नाट प्लान
ही कहाणी इथेच थांबत नाही तर इथे आता पोलिसांची एन्ट्री होते. विनोद पैसे घेऊन पळताच तिथे अचानक पोलीस अशी पाटी लावलेली एक फोरव्हिलर आली. त्यातून एक महिला व पुरुष बाहेर आले. हे तोतया पोलीस होते. त्या तोतया पोलिसांनी विनोद व आकाशचा पकडण्यासाठी पाठलाग केला. विनोद पकडल्या जाण्याच्या भीतीने शेतात पळाला तर पैशाची बॅग पळवणा-या आकाश पकडला गेला. तिथून आकाश व बॅग घेऊन ते आले त्याच गाडीने पसार झाले.
आकाशने सोन्याचे नाणे कमी भावात देतो सांगून फसवणूक करून लुटल्याचे विनोदच्या लक्षात आले. त्याने तातडीने किनवट पोलीस स्टेशन गाठले. दरम्यान विनोदला घटनास्थळी धाड टाकणारे पोलीसही तोतया असल्याचे कळाले. विनोदने आकाश पवार विरोधात लुटण्या संदर्भात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवत तात्काळ आपली चक्रे फिरवत आकाशला माहूर तालुक्यातील लांजी गावातून अटक केली.
कोण होते ते तोतया पोलीस?
आकाश पवार याची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने सोबत असलेली महिला मारेगाव येथील रहिवाशी असलेली संशयीत मंदा पासवान (ठमके) असल्याची माहिती पोलिसांना दिली. मोबाईलच्या लोकेशनवरून पोलिसांनी शोध घेतला असता ती मारेगाव येथे असल्याचे पोलिसांना आढळले. त्यांनी आज शुक्रवारी सकाळी दिनांक 25 डिसेंबर रोजी सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास मंदा पासवान हिच्या घरी छापा टाकून तिला अटक केली.
मंदाची चौकशी केली असता तिने आणखी दोघांची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी तोतया पोलिसांच्या गाडीचा ड्रायव्हर बनलेला अश्विन पडग्याळ व दुसरा तोतया पोलीस परशुराम प्रसाद याला मारेगाव येथून अटक केली. मारेगाव येथील तिघेही आरोपी सध्या किनवट पोलिसांच्या ताब्यात असून पोलिसांनी चौकशीसाठी त्यांना किनवट येथे नेले आहे.
सदर कारवाई किनवट पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरिक्षक गणेश पवार यांच्या सह जमादार सिद्धेश्वर कागणे, अमोल राठोड, अनिता गजलवार, वनिता बुरकुले यांनी केली. सिनेस्टाईल लुटलेल्या या प्रकरणातील आरोप मारेगाव येथील असल्याने सध्या शहरात याबाबत चांगलीच चर्चा रंगत आहे.
हे देखील वाचा:
हे देखील वाचा: