जितेंद्र कोठारी, वणी: विधवा बहिणीला घेऊन रेशनचे साहित्य आणण्याासाठी गेलेल्या भावावर बहिणीच्या सासऱ्याने चाकूने हल्ला करण्याची घटना शुक्रवार 22 जानेवारी रोजी तालुक्यातील मारेगाव (कोरंबी) येथे घडली. संतोष माधव पिंपळकर रा. लाठी ता. वणी असे जखमी व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी वणी पो.स्टे. येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. चंद्रभान रामाजी भुसारी (वय 50 वर्ष) रा. मारेगाव (को.) असे आरोपीचे नाव आहे.
संतोष माधव पिंपळकर रा. लाठी ता. वणी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मोठी बहीण उज्ज्वला हिचे लग्न 2008 मध्ये मारेगाव (को.) येथील महादेव भुसारी सोबत झाले. तिला दोन अपत्य असून तिच्या पतीचे 2018 मध्ये हार्टअटॅकने निधन झाले. पतीच्या मृत्यूनंतर तिचा सासरा चंद्रभान रामाजी भुसारी हे नेहमी तिला त्रास द्यायचे. सासऱ्याच्या त्रासामुळे उज्ज्वला आपल्या दोन्ही मुलांना घेऊन चार महिन्यांपूर्वी माहेरी राहायला आली. उज्जवलाचे रेशनकार्ड मारेगाव (को.) चे असल्यामुळे ती दर महिन्याला भावासोबत मारेगाव (को.) येथे जाऊन रेशन उचलत होती.
दि.22 जानेवारी रोजी संतोष आपल्या बहिणीला दुचाकीवर बसवून रेशन घेण्यासाठी मारेगाव (को.) येथे पोहचले. त्यावेळी बहिणीचा सासरा चंद्रभान रामाजी भुसारी दारु पिऊन तिथे पोहोचला. त्याने सुन उज्ज्वला यास अश्लील शिवीगाळ करुन मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच आरोपी हा चाकू घेऊन आपल्या सुनेच्या अंगावर धावून गेला. त्यावेळी संतोष हा आडवा आला असता आरोपीने त्याच्या हातावर चाकूने वार केला. चाकूच्या हल्ल्यात फिर्यादी संतोष माधव पिंपळकर याच्या डाव्या हाताच्या तळहातावर जखम होऊन रक्त लागले.
सर्व प्रकरणाबाबत फिर्यादी संतोष माधव पिंपळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी चंद्रभान रामाजी भुसारी (वय 50 वर्ष) रा. मारेगांव (को.) विरुद्द कलम 324, 504, 506 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
हे देखील वाचा: