जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील केसुर्ली येथे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. याप्रकरणी मृत युवतीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून मृतकाचे पती व सासू विरुध्द वणी पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की घुग्गुस जि. चंद्रपूर येथील विजय सदाशिव नागपुरे यांची कन्या स्नेहाचे लग्न केसुर्ली ता. वणी येथील क्रीष्णा गोविंदा मांढरे सोबत दि. 10.06.2019 रोजी रीतिरिवाजाप्रमाणे झाले होते. लग्नात विजय नागपुरे यांनी 1.5 लाख रुपये रोख मांढरे कुटुंबीयाना दिले. तसेच 1.4 लाख किमतीचे दागिने आपल्या मुलीला दिले. लग्नानंतर पती क्रीष्णा व सासू अंजनाबाई हिने चार पाच महिने स्नेहाला चांगली वागणूक दिली. मात्र त्यानंतर नवऱ्याचे खरे रूप समोर आले.
नेहमी दारु पिऊन घरी येणे व पत्नी स्नेहा सोबत मारहाण करण्याचे प्रकार सुरू झाले. तसेच क्रीष्णाने मोटरसायकल घेण्याकरिता वडीलांकडुन 1 लाख रूपये आणण्याचा तगादा स्नेहाकडे लावला. मात्र स्नेहाने माहेरून पैसे आणले नाही. त्यामुळे तिचा सतत शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. असे तक्रारीत म्हटले आहे.
या छळाला कंटाळुन स्नेहा हिने 5 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वाजता सुमारास घरातील बेडरूमच्या छताच्या लाकडी फाट्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.
घटनेची प्राथमिक तपासनंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून मर्ग दाखल केले. मात्र मृतक स्नेहाचे वडील विजय सदाशिव नागपुरे (वय 49 वर्ष) रा. श्रीराम वॉर्ड घुग्गुस जि. चंद्रपूर यांनी शुक्रवारी रात्री 9 वाजता पती व सासू यांनी मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार वणी पोलीस ठाण्यात नोंदविली.
पोलिसांनी तात्काळ आरोपी पती क्रीष्णा गोविंदा मांढरे (33) व सासू अंजनाबाई गोविंदा मांढरे (55) रा. केसुर्ली, ता. वणी यास अटक केली. आरोपी विरुद्द कलम 498(अ), 304 (ब), 34 आयपीसी अनव्ये गुन्हा दाखल करून शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाचे आदेशाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि संदीप एकाडे करीत आहे.
हे देखील वचाा: