जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउननंतर मागील काही महिन्यांपासून वणी शहरात छुप्या मार्गाने देहविक्री व्यवसाय फोफावत आहे. व्हाट्सएप, मेसेंजर, टेलिग्राम व इतर सोशल मिडिया ऍपच्या माध्यमातून सुरु या अनैतिक धंद्यामुळे महाविद्यालयीन तरुण तरुणीच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. साहित्यिक नगरी वणीच्या संस्कृतीवर गालबोट लावणाऱ्या अश्या गैरकृत्यांवर वेळीच बंधन लावण्याची मागणी होत आहे. दरम्यान वणीत दोन प्रतिष्ठीत व्यक्तीच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यात त्यांचे खुमासदार संभाषणाची चर्चा चांगलीच रंगत आहे.
वणी शहरात जत्रामैदान परिसरातील प्रेमनगर हा रेडलाईट एरिया म्हणून ओळखलं जाते. मागील अनेक दशकांपासून येथे देहव्यापार चालतो. मात्र अलीकडच्या काळात शहरातील काही प्रतिष्ठित व पॉश कॉलनीमध्ये भाडेतत्वावर घेतलेल्या फ्लॅट किंवा खोलीत सेक्स रॅकेट सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. देहविक्री व्यवसाय आता हायप्रोफाईल झाला आहे. मोबाइलच्या माध्यमातून देहविक्री व्यावसायिक किंवा दलाल ग्राहकांशी संवाद साधतात. गरजू व्यक्तीच्या मोबाइलवर मुलींची छायाचित्रेच नव्हे, रेट कार्डसुद्धा पाठविले जाते. मोबाइलवर संवाद साधून जागा व वेळ निश्चित केली जाते. त्यामुळे या गैरप्रकाराची वाच्यता सार्वजनिकरीत्या होत नाही.
सुरक्षेच्या दृष्टीने ओळखीच्या ग्राहकांनी शिफारस केल्यानंतरच नवीन ग्राहकाला मुलीची फोटो व्हाट्सएपवर पाठविली जाते. सोशल मीडियाच्या अशा वापरातून हा व्यवसाय फोफावल्याचे अनेक बड्या शहरांमध्ये उघड झाले. त्याचे लोण वणी सारख्या छोट्या शहरात देखील पसरले आहे. शहरातील काही ठराविक हॉटेल आणि लॉज मध्ये 500 ते 1000 रुपये तासाप्रमाणे खोली भाड्याने मिळत असल्याचेही बोलले जाते. नागरी आणि गजबजलेल्या परिसरात सुरु अनैतिक धंद्यामुळे त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना खासकरुन महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.
शहरात एका ठिकाणी हर्बल औषध विक्री व्यवसायच्या आडोशाने दाम्पत्यच सेक्स रॅकेट चालवीत असल्याची खमंग चर्चा आहे. पूर्वी या रॅकेटची सदस्य असलेली एका तरुणीने आता वेगळी चूल मांडल्याचीही माहिती समोर येत आहे. शहरात देहविक्री व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावला असला तरी यावर पोलीस विभागाचा अंकुश नसल्याचे दिसून येते. सज्ञान महिला व पुरुष दोघांच्या संमतीने प्रस्थापित शारीरिक संबंधावर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश तसेच अनैतिक देहव्यापार अधिनियम, अनैतिक रहदारी (प्रतिबंध) कायदा (पिटा ऍक्ट) च्या किचकट प्रक्रियेमुळे तक्रारी शिवाय पोलीसही कारवाईसाठी धजावत नाही.
देहविक्रीचा व्यवसाय करणे गुन्हा
कोणत्याही महिलेला आपली आजीविका चालविण्यासाठी व्यवसाय निवडण्याचा हक्क आहे. परन्तु व्यापारी हेतूने देहविक्रीसाठी एखाद्याला सक्ती करणे व लैंगिक छळवणूक करणे आणि त्या माध्यमातून कमाई करणे, सार्वजनिक ठिकाणी देहविक्रयाचा व्यवसाय करणे हा कायद्यांतर्गत गुन्हा आहे’. असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविला आहे.
क्रमश:
(वणीतील दोन प्रतिष्ठीत व्यक्तीच्या ऑडिओ क्लिपवर सविस्तर वृत्तांत पुढील भागात)