खावटी अनुदानाचे वाटप न केल्यास आंदोलनाचा इशारा
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे तहसिलदारांना निवेदन
नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील आदिवासी समाज गेल्या 5 महिन्यांपासून खावटी अनुदानापासून वंचीत आहे. त्यामुळे खावटी अनुदान तात्काळ वाटप करा या मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी परिषद तालुका शाखा मारेगावच्या वतीने तालुका अध्यक्ष अनिल गेडाम यांच्या नेतृत्वात तहसीलदारास निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री ऍड. के. सी. पाडवी यांनी 1 मे 2020 रोजी आदिवासी समाजाला खावटी देण्याची घोषणा केली होती. या संदर्भात आदिवासी विकास विभागाने 9 सप्टेंबर 2020 रोजी शासन निर्णय निर्गमित केला. शासन निर्णय निर्गमित करून 5 महिन्याचा कालावधी लोटून आदिवासी बांधव खावटी अनुदानापासून वंचित आहे.
खावटी अनुदान योजनेअंतर्गत आदिवासी कुटूंबाना 4 हजार रुपये अनुदान वर्ष भरासाठी देण्यात येणार आहे. यात 2 हजार रुपये रोख व 2 हजार वस्तू स्वरूपात मिळणार आहे. परंतु गेल्या पाच सहा महिन्यांचा कालावधी लोटून सुद्धा कुठलेच अनुदान मिळाले नाही. आदिवासी विकास मंत्र्यांनी आदिवासी समाजाची दिशाभूल तर करत नाही, असा सवाल दिलेल्या निवेदनातून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदने केला आहे.
येत्या 26 फेब्रुवारी 2021 पर्यंत खावटी न मिळाल्यास आदिवासी समाजातर्फे तीव्र आंदोलन पुकारले जाईल असा ईशाराही दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देते वेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे तालुका अध्यक्ष अनिल गेडाम, गंगाधर लोणसावले महाराज, चंदाताई सिडाम, सुधाकर गेडाम, मनोज पेंदोर, शारदा उईके, रामदास सोयाम आदी उपस्थित होते.
हे देखील वाचा:
मध्यरात्री पोलिसांची दारू तस्करांवर कार्यवाही, 9 लाखांचा मुद्देमाल जप्त