झरी तालुक्यात राजकीय पुढारी व कार्यकर्तेच बनले ठेकेदार

ठेकेदारांद्वारे राजकीय वापर करीत निकृष्ट दर्जाचे काम

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील विविध निधीतील कामाकरिता राजकीय पुढारी पदाधिकारी व कार्यकर्तेच ठेकेदार झाले आहे. राजकीय वरदहस्तामुळे या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावला असून परिणामी निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याची ओरड तालुक्यात आहे.

तालुक्यात खनिज विकास निधी अंतर्गत शाळेचे वॉल कंपाउंड, समाज भवन वॉलकंपाउंड तसेच काही ग्रामपंचायती अंतर्गत 14 व्या वित्त आयोगा अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ते याशिवाय विहिरी, शेततळे, मनरेगा अंतर्गत पांदण रस्ते यासाठी इतर कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ही सर्व कामे विविध राजकीय क्षेत्रातील पुढारी पदाधिकारी व कार्यकर्ते करीत आहे.

राजकीय वरदहस्ताचा वापर करीत वरील कामाकरिता अधिकारी, अभियंता व ग्रामपंचायत पातळीवर सचिव यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे. परसेंटेजच्या कचाट्यात अडकलेल्या काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचा-यांमुळे ठेकेदारांचे चांगलेच फावत आहे. मात्र यात सर्वसामान्यांचे चांगलेच नुकसान होत आहे. यातील अनेक कामांची तक्रार देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत करण्यात आली आहे. परंतु अद्याप कार्यवाही तर दूरच उलट त्याच भ्रष्ट ठेकेदारांना मोठ्या प्रमाणात कामे दिली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

निकृष्ट दर्जाचे काम
गेल्या दोन तीन वर्षात आरो प्लांट, सिमेंट रोड, वॉलकंपाउंड चे सर्व कामे राजकीय पुढारी व कार्यकर्त्यांनीच केले व कोट्यवधींची माया जमविली आहे. राजकीय ठेकरदारांच्या बहुतांश कामात रेतीचा वापर न करता काळ्या चुरीचा वापर केल्या जात आहे. विट जुडाई व भिंत छपाई करिता काळ्या चुरीचा वापर केला जात आहे. याकडे संबंधीत विभागाचे अर्थपूर्ण व राजकीय दबावामुळे दुर्लक्ष होत आहे.

निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत ग्रामस्थांनी विचारणा केल्यास लोकप्रतिनिधींच्या नावाचा वापर करून दबाव टाकला जात असल्याचा आरोप होत आहे. काही पुढारी “इकडून तिकडे व तिकडून इकडे” असे पक्षात उड्या मारून स्वतःची ठेकेदारी करीत आहे. तर काही कार्यकर्ते स्वत:लाच लोकप्रतिनिधी समजून थाटात ठेकेदारी करीत आहे. तर काही पुढारी व कार्यकर्ते तर रेतीचोरी व रेती तस्करीतही आघाडीवर आहे. अशा ठेकेदारीसाठी राजकीय पक्षाचा वापर करणा-यांमुळे पक्षाचीही प्रतिमा मलीन होत आहे.

ठेकेदारीसाठी दुसर-यांच्या नावाचा वापर
ठेकेदारी करणा-या अनेक कंत्राटदारांजवळ कोणत्याही प्रकारचा परवाना नसून दुसऱ्याच्या नावावर कामे घेऊन ते ठेकेदारी करीत आहे. ग्रामपंचायत अंतर्गत शाळेचे वॉलकंपाउंड, समाजभवन कंपाउंड, गावातील अंतर्गत सिमेंट रस्त्याच्या कामात चोरीच्या रेतीचा वापर सुरू आहे. ही रेती चोरीसुद्धा राजकीय पुढारीच करीत आहे.

तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत मध्ये खनिज विकास निधीतून आरोप्लान्ट बसविण्यात आले. एक प्लांट ७ लाख ५० हजार रुपये प्रमाणे बसविण्यात आले. त्यातील ९० टक्के आरोप्लान्ट आज बंद अवस्थेत आहे. ३ लाख ५० हजारांचा आरो प्लांट साडे सात लाखात बसविण्यात आला. नित्कृष्ट दर्जाच्या वस्तूंचा वापर केल्याने तालुक्यातील ९० टक्के आरो प्लांट बंद अवस्थेत आहे. यावरून या कामात झालेल्या भ्रष्टाचाराचा अंदाज येऊ शकतो.

अशा ठेकेदारांवर कार्यवाही करून त्यांच्याद्वारा केलेल्या कामाची चौकशी करावी अशी अपेक्षा परिसरातील सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहे.

हे देखील वाचा:

सेक्स रॅकेटच्या फंद्यात अडकले अनेक हायप्रोफाईल? (भाग 2)

मध्यरात्री पोलिसांची दारू तस्करांवर कार्यवाही, 9 लाखांचा मुद्देमाल जप्त

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.