निकेश जिलठे, वणी: शेतमालाला भाव नाही. फवारणीमुळे रोज मरणारे शेतकरी-शेतमजूर, जीएसटी, लांबलेली कर्जमाफी, लोडशेडिंग इत्यादी प्रश्नांसाठी काँग्रेसच्या वतीनं वणीत मंगळवारी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सरकारविरोधात घोषणा देऊन शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्न सोडवावे अशी मागणी करण्यात आली. माजी आमदार वामनराव कासावार आणि ऍड देविदास काळे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. वणी, झरी आणि मारेगाव तालुक्यातील सुमारे 500 शेतकरी आणि कार्यकर्ते जनआक्रोश मोर्चात सहभागी झाले होते.
शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर सरकारनं दिलेले कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे सर्वसामान्य आणि शेतक-यांचे हाल होत आहे. शेतक-यांना विनाअट सरसकट कर्जमाफी द्यावी. कीटकनाशकांच्या फवारणीमुळे मृत्यू झालेल्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये आणि गंभीर असलेल्या रुग्णांना 2 लाखांची मदत द्यावी. सोयाबीन आणि मुंगाची तातडीनं नाफेडतर्फे खरेदी सुरू करण्यात यावी, उत्पादन खर्च अधिक 50 नफा मिळेल इतका पिकांना भाव द्यावा इत्यादी मागणी साठी या जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.
वणीतील वसंत जिनिंग इथून दुपारी एकच्या सुमारास हा मोर्चा निघाला. टिळक चौक, खाती चौक, गांधी चौक, टागोर चौक, आंबेडकर चौक मार्गे तहसिल कार्यालयात हा मोर्चा आला. यावेळी वामनराव कासावार, देविदास काळे, विवेक मांडवकर, राजाभाऊ पाथ्रडकर, रंगरेज, गितघोष इत्यादींनी मनोगत व्यक्त केले. सरकारने जर मागण्या मान्य केल्या नाही तर भविष्यात तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या मोर्चात माजी आमदार वामनराव कासावार, वसंत जिनिंगचे अध्यक्ष ऍड देविदास काळे, विवेक मांडवकर, राजाभाऊ पाथ्रडकर, ओम ठाकूर, प्रशांत गौरकार, नरेंद्र पाटील ठाकरे, अनिल देरकर, राकेश खुराणा, सुनील वरारकर, राजू कासावार, विकेश पानघाटे, संदीप बुरेवार, भास्कर गोरे, वंदनाताई धगडी, निलिमाताई काळे, शालिनिताई रासेकर, सौ पावडे, सौ झिलपे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.