शेतमालाच्या दरात प्रचंड घसरण, कशी होणार शेतकऱ्यांची दिवाळी साजरी ? 

कापूस ₹ ३५००, सोयाबीन ₹ २०००

0

शिंदोला: वणी तालुक्यात सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन घरात येणे सुरू झाले आहे. दिवाळी साजरी करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीस सुरवात केली. मात्र बाजारपेठेत आवक वाढताच मालाच्या दरात कमालीची घसरण सुरू झाली आहे. हमीभावापेक्षा कमी दरात शेतमालाची खरेदी केली जात आहे. परिणामी ऐन  दिवाळीत शेतकऱ्यांसमोरील संकटांमध्ये वाढ झाली आहे. सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना आपण दिवाळी कशी साजरी करायची असा यक्षप्रश्न शेतकरी बांधवांना पडला आहे.

वणी तालुक्यासह सर्व शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक नियोजन हे कापसावर अवलंबून असते.यावर्षी दसऱ्यापासूनच सोयाबीनसह कापूस शेतकऱ्यांच्या घरात येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे कापूस खरेदी केंद्र सुरू करावे,अशी मागणी होती. परंतु पणनच्या खरेदीचा मुहूर्त निघाला नाही ; व्यापाऱ्यांनी खेडा खरेदी सुरू केली आहे.

ऐन सोयाबीन काढणीच्या तोंडावर परतीचा पाऊस झाल्याने सोयाबीनचा दर्जा घसरला आहे. सरासरी रुपये २२०० ते २५०० दर मिळत आहे. काही ठिकाणी तर रुपये १२०० पासून व्यापारी मागणी करीत आहे. गत आठवड्यात झालेल्या पावसाने वेचणीस आलेला कापूस ओला झाला. ओला कापूस सुकवून विक्रीसाठी नेत आहे. परंतु कापसाचा दर्जा खालावल्याचे कारण पुढे करीत व्यापारी  रुपये ३००० ते ३५०० पर्यंत कापसाची खरेदी करीत आहे. हमीभावापेक्षा कमी दरात शेतमालाची खरेदी करणे गुन्हा आहे.परंतु कुठेही  व्यापाऱ्यांवर कारवाई झाल्याचे दिसून येत नाही.

दिवाळीच्या बाजारात खरेदीसाठी कर्मचारी व व्यावसायिक वर्गाची गर्दी दिसून येते. मात्र आर्थिक विवंचनेत सापडलेला बळीराजा कुठेतरी हरविल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांसाठी मोठ- मोठ्या घोषणा करणारे मूग गिळून गप्प बसले आहेत. मात्र या आश्वासनांच्या खेळात शेतकऱ्यांचा डाव अर्ध्यावर मोडल्यागत स्थिती निर्माण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.