रेती तस्करांची नवी शक्कल, रातोरात बुजवले खड्डे
परसोडा, मुंजाळा व अनंतपुर घाटावरून रेती चोरी सुरू
सुशील ओझा, झरी: परसोडा, पैनगंगा रेती घाटावर रेतीचोरी सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यामुळे नायब तहसिलदार खिरेकर यांच्या आदेशावरून तलाठी व पोलीस पाटीलांनी परसोडा घाटावर जाणाऱ्या मार्गावर 4 ते 5 फूट लांबी व रुंदीचे अनेक खड्डे खोदले होते. खड्डयांमुळे तस्करांना ट्रॅक्टरद्वारा रेती चोरी करता येणार नाही व रेती तस्करीला आळा बसेल असा या मागचा उद्देश होता. पण दोन दिवसांपूर्वीच रेती चोरट्याने रातोरात खड्डे बुजवून रेतीचोरी सुरू केली आहे.
याबाबतची माहिती नायब तहसीलदार खिरेकर यांनी मुकुटबन ठाणेदारांना दिली व याची पाहणी करण्यास सांगितले. ठाणेदार सोनुने यांनी त्या रस्त्याची पाहणी केली असता परसोडा घाटावरील रस्ता रेती चोरट्यांनी बुजविल्याचे आढळून आले.
सदर तस्कर हे तालुक्यातील मुकुटबन, पिंपरड येथील असून त्यांची संख्या सहा ते सात आहे. तालुक्यात घर, दुकान व इतर बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याचा फायदा घेत मुकुटबन येथील 3 ते 4 व पिंपरड येथील 3 रेती चोरटे कुणालाही न भीता राजरोसपणे रेती चोरी करुन त्याची विक्री करीत आहे. दरम्यान रेती तस्कर काही पोलीस कर्मचारी व महसूल कर्मचाऱ्यांना हातशी धरून हा धंदा चालवत असल्याची माहिती आहे.
रेती चोरटे रात्री 10 ते पहाटे 6 वाजेपर्यंत रेतीचोरी करून ट्रॅक्टरने वाहतूक करीत आहे. रेती भरलेल्या ट्रॅक्टर सोबतच दुचाकीने ट्रॅक्टरच्या अर्धा किमी पुढे एक व्यक्ती ट्रॅक्टर पकडण्याकरिता कुणी प्रशासनाचे अधिकारी आहे का याची पाहणी करीत असतो. रस्ता मोकळा दिसताच रेतीची वाहतूक केली जाते. महसूल विभागाची टीम रेतीचे ट्रॅक्टर पकडण्याकरिता येणार असल्यास रेती चोरट्यांना याची माहिती अधीच असते. काही भ्रष्ट कर्मचारी या कामी त्यांना मदत करीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे तहसीलदार व नायब तहसीलदार यांना कारवाईस अडचण येत आहे.
मुकुटबन, पिंपरड, नेरड, तेजापूर, अडेगाव येथील रेती तस्कर परसोडा, मुंजाळा व नेरड येथील पैनगंगा नदीतील व नाल्यातून रेतीचोरी होत आहे. पाटण, कोसारा, अडेगाव, झरी, नेरड, साखरा, तेजापूर व इतर गावे. याशिवाय पाटण, मांगली, दुर्भा, वठोली व तेलंगणातील अनंतपुर येथून सुद्धा 15 ते 20 रेती तस्कर तस्करी करीत आहे. या सर्वच रेती चोरट्यांनी नाव व त्यांचे गाडी नं प्रशासनाला माहिती असून त्याबाबत कोणतीही कार्यवाही केली जात नाही आहे.
अलिकडच्या काही विशिष्ट कारवाईमुळे पोलीस विभागाबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेरच्या रेती तस्करांबाबत स्थानिक रेती तस्करच पोलिसांना माहिती देत असून केवळ फायद्याचे ट्रक पकडायचे व इतरांकडे दुर्लक्ष करायचे अशी भूमिका पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे. बाहेरच्या तस्करांचा गेम करण्यासाठीच एकाला सूट तर दुस-याला शिक्षा असल्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. अलिकडच्या काही विशिष्ट कारवाईमुळे यावर शिक्कामोर्तब देखील होत आहे.
हे देखील वाचा: