जब्बार चीनी, वणी: ‘ब्रेक दे चेन’ अंतर्गत येणारे लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. यात सुट देण्यात आलेल्या महत्त्वाच्या बाबी म्हणजे आधी सकाळी 11 पर्यंत सुरू ठेवता येणा-या दुकानांचा वेळ वाढवून आता तो दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात आला आहे. तर अत्यावश्यक सेवेत न येणा-या पण एकल जागी असलेले आस्थापने सुरू होण्यास परवानगी मिळाली आहे. हे दुकाने देखील दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. केवळ कृषिशी संबंधित दुकाने 3 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच कृषी संबंधित बियाणे, खते आणि इतर माल उतरविण्यास 5 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. आज याबाबत जिल्हा प्रशासनाने परिपत्रक काढले आहे. सदर नियम हे 2 जून पासून लागू होणार असून हे नियम 15 जून पर्यंत लागू राहणार आहे. या नियमांमुळे व्यापा-यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनची आता अनलॉककडे वाटचाल सुरू झाली आहे. यात सर्वाधिक फायदा हा अत्यावश्यक सेवेत येणार नसलेल्या दुकानांना होणार आहे. प्रशासनाने एकल दुकाने (स्टॅन्ड अलोन) म्हणजे जे दुकाने शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये नाही किंवा जे दुकाने मॉलमध्ये नाहीत. ज्याच्या आजुबाजुला इतर दुकाने नाहीत अशी एकल दुकाने सुरू ठेवण्यास मुभा दिली असून हे देखील दुकाने दुपारी 2 पर्यंत सुरू ठेवता येणार आहे. पण ही दुकाने शनिवारी आणि रविवारी सुरू ठेवता येणार नाही. तर अत्यावश्यक सेवेत येणारी दुकाने सर्व दिवस सुरू राहिल. शॉपिंग कॉम्प्लेक्स व मॉल मधले दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी न मिळाल्याने त्यांची निराशा झाली आहे.
दुकान मालक, दुकानातील कर्मचारी आणि घरपोच सेवेसाठी कोरोना चाचणी आवश्यक केली आहे. कोविड नियमांचे पालन न केल्यास 5 हजार रुपयांचा दंड आहे. तर याशिवाय मुभा नसलेले दुकाने राहिल्यास त्यास 50 हजारांचा दंड आकारण्याची तरतूद कायम ठेवण्यात आली आहे. लग्न घरगुती स्वरूपात केवळ 25 लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी आहे. मंगल कार्यालयात लग्न समारंभ करण्यास बंदी कायम ठेवण्यात आली आहे.
इतर नियमांमध्ये फारसा बदल कऱण्यात आलेला नाही. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊ जरी सुरू राहणार असले तरी त्याचे नियम शिथील करून अनलॉकच्या प्रक्रियेकडे वाटचाल सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने आज एक परिपत्रक काढले.
हे देखील वाचा: