जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील वनोजा (देवी) शिवारात हिवरा गोरज मार्गावर आनंदराव जीवतोडे यांच्या शेतात खुल्या जागेवर साठवलेली अंदाजे 3 हजार ब्रास रेती वैध असल्याचा खुलासा महसूल विभागाने केला आहे. विशेष पोलीस पथकाने मंगळवार 8 जून रोजी रेतीची अवैधरित्या साठवणूक असल्याच्या संशयावरून या ठिकाणी धाड टाकली होती. तसेच रेतीसाठाचा पंचनामा व फोटो काढून प्रकरण मारेगाव महसूल विभागाकडे सुपूर्द केले होते.
प्राप्त माहितीनुसार मौजा आप्टी, ता. मारेगाव येथील रेतीघाट लिलावधारक मे. प्रिन्स इंटरप्राईजचे मालक नीलेश बिजवे रा. अमरावती यांना मंजूर आहे. आपटी रेती घाटातून 10 जून 2021 पर्यंत 7951 ब्रास रेती उत्खनन करण्याची मंजुरी देण्यात आली आहे. मात्र लिलावधारकांनी दि. 25 मे पर्यंत 2381 ब्रास रेती उत्खनन केल्याचे अहवाल खनिकर्म विभागाने दिले आहे. त्यामुळे लिलाव मुदत संपुष्टात येण्यापूर्वी उर्वरित 5570 ब्रास रेती उत्खनन करून साठवणूक करण्याची परवानगी अर्ज लिलावधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्याकडे केला होता.
विनंती अर्जाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने अर्जदार मे. प्रिन्स इंटरप्राईज प्रोप्रा. नीलेश बिजवे यांना 10 जून पूर्वी रेती साठवणूक करण्याची परवानगी दिली. रेती साठवणूकीसाठी मौजा गोरज येथील आनंदराव महादेव जीवतोडे यांचे शेत सर्व्हे नं. 48 मधील 2 हे.आर. तसेच मौजा आप्टी ता. मारेगाव येथील भाऊराव रामचंद्र उराडे यांचे शेत सर्व्हे नं. 177/2 मधील 2.31 हे.आर. क्षेत्रात रेतीसाठा करण्यास हरकत नसल्याचा अहवाल तहसीलदार मारेगाव कडून देण्यात आला आहे.
त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय खनिकर्म शाखा यवतमाळ यांचे आदेश क्रमांक खनिकर्म/कावि/भौ.मा.प्र.सहा./2021/381 द्वारा लिलावधारकास सदर जागेवर 25 मे ते 10 जून पर्यंत जास्तीत जास्त 5570 ब्रास रेती साठवणूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अपर जिल्हाधिकारी ललित वऱ्हाडे यांच्या सह्यानिशी सदर आदेश निर्गमित करण्यात आले आहे.
रेतीची साठवणूक कायदेशीर परवानगीनेच: डॉ. जावळे
दि. 8 जून रोजी विशेष पोलीस पथकाने गोरज येथील जीवतोडे यांचे शेतात साठवून ठेवलेला रेतीसाठा बेकायदेशीर असल्याच्या संशयावरून कारवाई केली होती. मात्र लिलावधारकाना रेती साठवणुकीची परवानगी देण्यात आलेली आहे. आमच्या चौकशीत परवानगीपेक्षा जास्त रेती साठा आढळलेला नाही. रेतीघाट लिलावधारकाने कायदेशीर प्रक्रिया पार पाडून तसेच नियम व अटीचे आधीन राहून रेती साठवणूक केली आहे.
– डॉ. शरद जावळे, उपविभागीय अधिकारी, वणी
हे देखील वाचा: