चारगाव चौकीवर सिनेस्टाईल पाठलाग करून दारू तस्कराच्या आवळल्या मुसक्या

75 हजारांची देशी विदेशी दारू जप्त, विशेष पोलीस पथकाची कारवाई

2

जितेंद्र कोठारी, वणी: विशेष पोलीस पथकाची धडाकेबाज कारवाई सुरुच आहे. आज पहाटे विशेष पथकाने चारगाव चौकीवर दारुची अवैधरित्या वाहतूक करणारे एक वाहन पकडले. या कारवाईत 75 हजारांची देशी विदेशी दारूसह, कार, मोबाईल असा एकूण 3 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दारूची वाहतूक करणारा आरोपी हा चंद्रपूर येथील रहिवाशी असून त्याला अटक करत त्याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

शुक्रवारी दिनांक 11 जून रोजी पहाटे 5 वाजताच्या सुमारास विशेष पोलीस पथकाची शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग सुरू होती. दरम्यान सपोनि मुकुंद कवाडे त्यांना खबरीकडून एका कारमधून चंद्रपूर जिल्हयात दारूची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यावरून मुकुंद कवाडे यांनी पथकासह चारगाव चौकी गाठली. तिथे पथक व दोन पंचांना सोबत घेऊन त्यांनी फिल्डिंग लावली.

दरम्यान वणीच्या दिशेकडून एक टाटा इंडिगो कार (MH30 AA5040) चारगाव चौकीच्या दिशेने भरधाव येताना दिसली. मात्र पोलीस पथक उभे दिसताच चालकाने तात्काळ यू टर्न घेतला व वणीच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस पथकाने लगेच कारचा सिनेस्टाईल पाठलाग केला. काही अंतरावर या कारचा पाठलाग करून थांबवले. चालकाला विचारणा केली असता त्यांने त्याचे नाव दिलशान सादीक काझी (25) रा, सपना टॉकीजमागे चंद्रपूर असे सांगितले.

त्याच्या कारची पंचासमक्ष तपासणी केली असता त्यात रॉकेट या देशी दारू कंपनीच्या 90 मीलीचे 17 बॉक्स (1700 नग) आढळून आले. ज्याची किंमत 44,200 रुपये तसेच मॅकडॉवल नंबर वन या कंपनीचे 180 मीलीचे 4 बॉक्स (192 नग) आढळून आले. ज्याची किंमत 30,720 रुपये आहे. अशी एकूण 74, 920 रुपयांची दारू या कारमध्ये आढळून आली. चालकाला सदर दारुच्या वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याने याचा परवाना नसल्याची माहिती दिली.

सदर माल कुणाच्या सांगण्यावरून आणण्याबाबत विचारणा केली असता आरोपी दिलशानने चंद्रपूर येथील विकी आत्राम यांच्या सांगण्यावरून वणीतील सुधीर पेटकर नामक एका व्यक्तीने डोर्लीकर यांच्या भट्टीच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत हा माल सुपुर्द केला. हा माल तो अक्षय बुरडकर रा. सपना टॉकीज जवळ चंद्रपूर यांना पोहचवत असल्याचेही त्याने सांगितले. विशेष पथकाने देशी-विदेशी दारू, टाटा इंडिगो कार, मोबाईल, असा एकूण 3 लाख 30 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विशेष पोलीस पथकाचे हेड क़ॉन्स्टेबल राजू बागेश्वर यांच्या फिर्यादीवरून आरोपी दिलशान सादीक काझी (25) याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमच्या कलम 65 (अ), (ई) याच्यासह मोटर वाहन कायद्याच्या कमल 130 व 177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजपळ पाटील मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथक वणी व पांढरकवडा उपविभागीय प्रमुख सपोनि मुकुंद कवाडे, नापोकॉ मुकेश करपते, नापोकॉ जितेश पानघाटे, मिथून राऊत, पोकॉ नीलेश भुसे, पोकॉ अजय वाभीटकर, पोहेकॉ महाजन यांनी केली. विशेष पोलीस पथकाची धडाकेबाज कारवाई सुरूच असल्याने अवैध धंदेवाल्यांच्या मनात धडकी भरली आहे.

हे देखील वाचा:

वणीसह ग्रामीण भागातही आज दमदार पाऊस

कुंभा येथे विहिरीत उडी घेऊन विवाहित तरुणाची आत्महत्या

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

2 Comments
  1. […] चारगाव चौकीवर सिनेस्टाईल पाठलाग करून… […]

  2. […] चारगाव चौकीवर सिनेस्टाईल पाठलाग करून… […]

Leave A Reply

Your email address will not be published.