धक्कादायक ! एकाही शेतक-यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा नाही
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन बोगस निघाल्याचं सेनेचा आरोप
ज्योतिबा पोटे, मारेगाव: राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिवाळीच्या दिवशीच राज्यातील शेतकऱ्यांचे पूर्ण कर्ज माफ़ करू असे आश्वासन दिले होते. मात्र तालुक्यातील एकाही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्ज माफीचा एकही रूपयाही जमा झाल्या नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यासंदर्भात मारेगाव शिवसेना कार्यकर्त्यांनी शहरातील मध्यवर्ती बँक स्टेट बँक मध्ये जाऊन कर्ज माफ़ीच्या संदर्भात विचारणा केल्यावर त्यांनी ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप केला.
महाराष्ट्र शासनाने शिवाजी महाराजांच्या नावावर दिलेली कर्जमाफी ही आधीच जाचक अटी आणि शर्तीने वादात अडकली होती. मोठा गाजावाजा करत मीडियात पब्लिसिटी करत मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचे सर्टिफिकेटचे वाटप केले. मात्र ही कर्जमाफी फसवी असल्याचं आता दिसून येत आहे. कारण मारेगाव तालुक्यात कोणत्याच शेतक-यांच्या खात्यावर अद्याप एक रुपयाही जमा झालेला नाही. त्यामुळे हा शिवाजी महाराजचा घोर आपमान असून सरकार कर्जमाफीच्या नावावर शेतक-यांची फसवणूक करत असल्याचा आरोप मारेगाव शिवसेनेनं केला आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात किती रक्कम जमा झाली याची विचारणा करण्यासाठी सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बँकेत धडक दिली. यात मारेगाव तालुका शिवसेना प्रमुख गजानन किन्हेकर, पंचायत सभापती उपसभापती संजय आवारी, देवा बोबडे, सचिन पचारे, राजू मोरे, मधु वरटकर, विशाल किन्हेकर, सुभाष बदकी, तुलसीराम मस्की, राजू मांदाळे, डुमदेव बेलेकर, हरिभाऊ रामपूरे इत्यादी कार्यकर्ते होते. मात्र त्यांना शेतक-यांच्या खात्यात कोणतीही रक्कम जमा झाली नसल्याचे सांगण्यात आले.
मा. मुख्यमंत्र्यांनी सर्व शेतकऱ्यांना कर्ज माफ़ी मिळेल आणि शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जाईल असे आश्वासन दिले होते. पण या सर्व गोष्टी खोट्या ठरत असून आज आम्ही शिवसेनेच्या वतीने सर्व बँकेत चौकशी केली असता मारेगाव तालुक्यातील एकाही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्ज माफीची रक्कम जमा झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे. परिणामी हे शासन खोटे बोला पण रेटून बोला ही म्हण खरी ठरवत आहे
– संजय आवारी उपसभापती पं.स. मारेगाव