पत्नीच्या बदनामीची धमकी दिल्याने पतीची गळफास घेऊन आत्महत्या

एकाच कुटुंबातील तिघांना अटक

0

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथील प्रभाग क्रमांक 4 मध्ये राहणा-या प्रमोद किसन ठेंगणे (35) या विवाहित तरुणाने शहरातील (हुडकी) महादेव मंदिराच्या मागील परिसरात असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन बुधवारी आत्महत्या केली होती. या प्रकरणी मृतकाच्या खिशात सुसाईड नोट (चिठ्ठी) आढळली होती. मृतकाची पत्नी रोशना प्रमोद ठेंगणे यांच्या तक्रारीवरून पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी एकाच कुटुंबातील तिघा संशयीतांना अटक केली आहे. आकाश पंढरी भगत (30), पंढरी बंडू भगत (53) छाया पंढरी भगत (45) असे अटक करण्यात आलेल्यांचे नावे आहे.

तक्रारीनुसार, मृतक प्रमोद हा शहरातील प्रभाग क्र. 4 मधील रहिवाशी होता. तो मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. त्यांच्या घरा शेजारीच भगत कुटु्ंब राहायचे. दिनांक 15 जून रोजी शुल्लक कारणावरून ठेंगणे आणि भगत कुटुंबीयांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी भगत कुटुंबीयांनी मृतक प्रमोद ठेंगणेला शिविगाळ करत त्याच्या पत्नीची बदनामी करण्याची धमकी दिली होती. तेव्हा पासून प्रमोद हा मानसिक तणावात होता.

दिनांक 23 जून रोजी सकाळी 6 वाजताच्या दरम्यान प्रमोद हा घरून निघून गेला. त्यानंतर दुपारी 3 वाजताच्या सुमारास प्रमोद हा शहरातील (हुडकी) महादेव मंदिराच्या मागील परिसरात असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. मृतकाच्या खिशात सुसाईड नोट आढळली होती. मृतकाच्या कुटुंबीयांनी आरोपींना तात्काळ अटक न केल्यास मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली होती.

पोलिसांनी बुधवारी रात्री आकाश पंढरी भगत (30), पंढरी बंडू भगत (53) छाया पंढरी भगत (45) यांना अटक केली. मृतकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून त्यांच्यावर भादंविच्या कलम 306, 504, 506, 34 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहे. गेल्याच आठवड्यात प्रभाग क्रमांक 4 मध्ये एका तरुणाने आत्महत्या केली होती. त्यानंतर आठवडाभरातच आणखी एक आत्महत्या झाल्याने प्रभागातील रहिवाशी हादरले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.