तणनाशक पिऊन हटवांजरी येथील शेतक-याची आत्महत्या

तालुक्यात दर आठवड्यात आत्महत्या... प्रशासन, लोकप्रतिनिधी निद्रावस्थेत

0

भास्कर राऊत, मारेगाव: हटवांजरी येथील शेतकऱ्याने तणनाशक पिऊन आत्महत्या केली. सोमवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. देवराव लटारी फरताडे (40) असे मृत शेतक-याचे नाव आहे. त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू होता. रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रकल्पात गेलेल्या शेतीचे संपूर्ण पैसे न मिळाल्याने ते नैराश्यात होते अशी माहिती मिळत आहे. सततच्या आत्महत्येमुळे मारेगाव तालुका हादरला आहे. तालुक्यामध्ये दर आठवड्यामध्ये एक ते दोन आत्महत्या होत आहे. मात्र अद्यापही प्रशासनासह लोकप्रतिनिधीही निद्रावस्थेत आहे.

देवराव फरताडे हे हटवांजरी येथील रहिवाशी होते. गावालाच त्यांची 3 एकर शेती होती. काही वर्षांपूर्वी ही शेती धरण क्षेत्रात गेली. त्या जमिनीचा पुरेसा मोबदला त्यांना मिळालेला नाही. अशातच जी रक्कम त्यांना मिळालेली होती त्या रकमेत त्यांनी तालुक्यातील हिवरा-मजरा येथे 3 एकर शेती घेतली होती.

सोमवारी दि. 26 जुलैला ते हिवरा येथे शेती बघायला गेले होते. परत येताना त्यांनी कचऱ्यावर मारायचे औषध घरी आणले. शेतीचा, कुटुंबाचा खर्च आणि प्रकल्पात गेलेल्या शेतीची पूर्ण रक्कम अद्याप न मिळाल्याने ते कायम नैराश्यात राहायचे.

देवराव यांनी रात्री 10 च्या दरम्यान राऊंड अप नामक औषध घेतले. याची माहिती घरच्यांना कळताच त्यांना तात्काळ दवाखान्यामध्ये हलविण्यात आले. तब्येत एकदम खालावल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले. परंतु चंद्रपूर येथे मध्यरात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यामागे आई, पत्नी आणि दोन मुली असा आप्तपरिवार आहे.

हे देखील वाचा:

तेजापूर येथील शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांची नासधूस

सेवानिवृत्त पोलिसाच्या दुचाकीच्या डिक्कीतून 45 हजार रुपये लंपास

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.