वनविभागाच्या परवानगीत अडकला मार्डीजवळील फिस्की जंगल रस्ता

दापोरा व फिस्की जंगल रस्ता वनविभागाच्या हद्दीत असल्याने काम रखडले

0

भास्कर राऊत, मारेगाव: खैरी-मार्डी-नांदेपेरा या राज्यमार्गावरील फिस्कीच्या जंगलातून जाणाऱ्या रस्त्याच्या कामाकरिता वनविभागाने अद्यापही हिरवी झेंडी दाखवलेली नाही. त्यामुळे या दुरवस्था झालेल्या या रस्त्याचे काम रखडले आहे. सध्या पावसाळ्याच्या काळात या रस्ता खड्डेमय झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वनविभागाने लवकरात लवकर परवानगी देऊन या मार्गातील अडचणी दूर कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

खैरी-मार्डी-नांदेपेरा या 22 किमी रस्त्याचे काम वेगाने सुरु आहे. या रस्त्याच्या कामासाठी 54 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात खैरी ते मार्डी व दुस-या टप्प्यात मार्डी ते नांदेपेरा अशा पद्धतीने काम सुरू आहे. खैरी ते मार्डी रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कामाच्या वेगामुळे जनसामान्यांकडून कौतुक केले जात आहे.

मात्र या राज्यमार्गावरील दापोरा व फिस्की जंगल रस्ता वनविभागाच्या हद्दीत येतो. या रस्त्याचे रुंदीकरण करण्याकरिता रस्त्या लगतचे झाडे तोडणे आवश्यक आहे. मात्र अद्यापही वनविभागाकडून याकरिता परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे या फिस्की जंगलातील रस्त्याचे काम रखडले आहे.

फिस्की जंगलातील रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. मार्डी ते नांदेपेरा या रस्त्याचे काम सुरु असून या वनविभागाच्या हद्दीतील रस्त्यास परवानगी न मिळाल्यास हा रस्ता जैसे थे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वनविभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

परवानगीसाठीची प्रक्रिया सुरू: आसूटकर
वनविभागाच्या परवानगीमुळे काम रखडले असले तरी त्यासाठी आवश्यक त्या परवानगीची प्रक्रिया सुरू आहे. येत्या आठवडा भरात परवानगी मिळून जाईल व रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल.
:सुरेश आसुटकर, अभियंते, साबांवि

हे देखील वाचा:

विवाहित महिलेचे शोषण केल्याप्रकरणी ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

अबब ! पिकाच्या प्रारंभीच्या अवस्थेत कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.