सुशील ओझा, झरी: गेल्या काही दिवसांपासून वादात अडकलेले मुकुटबन पोलीस स्टेशनचे ठाणेदार धर्मा सोनुने, सहाय्यक फौजदार ऋषी ठाकूर, तत्कालीन रायटर सुलभ उईके यांना जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. एका ट्रॅक्टर मालकाकडून मध्यस्थाद्वारे 50 हजारांची लाच घेऊन वरून खोटा गुन्हा ही दाखल केला असा आरोप तक्रारकर्ते दीपक उदकवार यांनी करत याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली होती. याबाबत पैसे घेतल्याची एक कथित ऑडिओ क्लिप परिसरात व्हायरल झाली होती. एकतर पैसेही घेतले आणि वरून गुन्हाही दाखल केला याबाबत तालुक्यात चांगलीच खमंग चर्चा रंगली होती. या सर्व प्रकारामुळे पोलिसांच्या प्रतिमेला धक्का पोहोचत होता. दरम्यान मुकुटबन पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदाचा प्रभार पीआय अजित जाधव यांनी घेतल्याची माहिती आहे.
सविस्तर वृत्त असे की, मुकुटबन येथील रहिवासी असलेले दीपक उदकवार हे हॉटेल व्यावसायिक आहे. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांना रेतीची आवश्यकता होती. पाऊस सुरू असल्याने रेती मिळत नसल्याने त्यांनी ड्रायवरला रेती आणायला सांगितली. दरम्यान एक महिन्याआधी येडशी गावाजवळ ठाणेदार धर्मा सोनुने व सहाय्यक फौजदार ऋषी ठाकूर यांनी पहाटे 6 वाजताच्या दरम्यान त्यांचा ट्रॅक्टर पकडला. कोणताही पंचनामा न करता ट्रॅक्टर जप्त करून पोलीस स्टेशनला लावला.
पोलिसांनी ट्रक्टर मालक दीपक उदकवार यांना घटनेच्या दिवशी सकाळी 9 वाजता ठाण्यात बोलाविले. उदकवार ठाण्यात गेले असता ठाणेदार सोनुने व सहाय्यक फौजदार ऋषी ठाकूर हजर होते. दोघांनीही दीपक याला 1 लाखांची लाच मागितल्याचा तक्रारकर्त्यांचा आरोप होता. तसेच पैसे न दिल्यास रेती चोरीचा गुन्हा दाखल करतो व महसूल विभागाकडे ट्रॅक्टर सोपवून दीड लाखाचे दंड ठोठवायला लावतो असे देखील धमकावले.
ठाणेदार सोनुने यांचे तत्कालीन रायटर सुलभ उईके यांनी मोबाईलद्वारे दीपक यांना फोन करून 1 लाखांवरून 50 हजारांच्या बदल्यात कोणताही गुन्हा दाखल न करण्याची सेटलमेंट केली. त्यानुसार 50 हजार रुपये देण्याचे कबूल झाले. ठाणेदार सोनुने व ऋषी ठाकूर यांनी 50 हजार आणण्याकरिता होमगार्ड निखिल मोहितकर यांना दीपक यांच्या हॉटेल मध्ये पाठविले.
होमगार्ड मोहितकर हे हॉटेल मध्ये गेले. त्यांनी दीपक यांच्या पत्नी जवळून 50 हजार रुपये घेतले व ठाणेदार सोनुने यांना दिले असा दीपक उदकवार यांचा आरोप आहे. मात्र 50 हजार देऊन देखील ठाणेदार व सहाय्यक फौजदार यांनी दीपक उदकवार यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. दरम्यान आकसेपोटी चालकांवर गुन्हा दाखल न करता उदकवार यांच्यावर गुन्हा दाखल केला असा देखील तक्रारकर्त्यांचा आरोप होता.
ऑडिओ क्लिपमुळे पोलिसांची प्रतिमा मलिन
या संपूर्ण प्रकरणात पैशाच्या देवाणघेवाण बाबत एक कथित ऑडिओ क्लिप परिसरात व्हायरल झाली. यात तक्रारदार एका व्यक्तीशी बोलत असून तो मध्यस्थी असलेला होमगार्ड असल्याचा दावा केला जात आहे. यात तक्रारदार हे पैसे पोहोचले का? याबाबत विचारणा करीत असून दुसरी व्यक्ती साहेबांना पैसे दिल्याचे सांगत आहे. तसेच तक्रारदार पैसे घेतल्यावरही गुन्हा का दाखल केला? अशी देखील विचारणा करीत आहे. ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने पोलीस विभागाच्या अब्रुचे धिंडवडे निघाले होते. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर ठाणेदार सुट्टीवर गेले होते हे विशेष.
तक्रारदारांनी यवतमाळ येथे जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केल्यानंतर याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले होते. अखेर या प्रकरणी कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका ठेऊन ठाणेदार धर्मा सोनुने, सहाय्यक फौजदार ऋषी ठाकूर तत्कालीन रायटर सुलभ उईके यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
अजित जाधव यांच्याकडे प्रभार
जिल्हा कार्यालयातील सायबर सेल विभागातील पीआय अजित जाधव यांना मुकुटबन पोलीस ठाण्याचा प्रभार देण्यात आला आहे. मुकुटबन पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गेल्या काही काळापासून मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफावले आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात नाराजी होती. अवैध दारू तस्कर, गोवंश तस्कर, गुटखा तस्कर इत्यादींवर आळा घालण्याचे आव्हान पीआय जाधव यांच्या पुढे आहे. आता अजित जाधव हे याबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.