भाजप नगरसेवकाच्या काँग्रेस प्रवेशाने शहरात भाजपला मोठे भगदाड

आधीच दोन नगरसेवक निलंबीत, तिस-या नगरसेवकाच्या पक्षबदलाने भाजपमध्ये अस्वस्थता

0

जब्बार चीनी, वणी: शहरातील भाजपचे नगरसेवक संतोष पारखी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थित त्यांनी पक्षप्रवेश केला. पक्ष प्रवेश करताच पारखी यांना वणी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पद देण्यात आले आहे. वेगवेगळ्या प्रकरणात अडकलेल्या भाजपच्या दोन नगरसेवकांचे पक्षाने आधीच निलंबन केले आहे. त्यानंतर आता एक नगरसेवकानेच चक्क पक्ष बदलवल्याने भाजपला शहरात चांगलेच भगदाड पडल्याचे बोलले जात आहे.

नाना पटोलेंनी पक्षाची कमान सांभाळताच वणी काँग्रेसमधली मरगळ दूर होऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. येत्या काळात वणी नगरपालिकेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी काँग्रेसने आतापासूनच फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. रविवारी 1 ऑगस्ट रोजी ऊर्जामंत्री नितीन राऊत हे वणी येथे आले होते. दरम्यान माजी आमदार वामनराव कासावार यांच्या निवासस्थानी आढावा बैठक झाली. यावेळी माजी आमदार वामनराव कासावार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍड देविदास काळे, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे. अशोक चिंडालिया व काँग्रेसचे जेष्ठ यांच्या उपस्थितीत भाजपचे प्रभाग क्रमांक 13 चे नगरसेवक संतोष पारखी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन सर्वांनाच धक्का दिला.

याबाबत अत्यंत गुप्तता ठेवण्यात आली होती. ही माहिती पुढे येताच वणी भाजपसह राजकीय वर्तुळातही एकच खळबळ उडाली. पक्षप्रवेश करताच नगरसेवक संतोष पारखी यांना वणी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावेळी ओम ठाकूर, इजहार शेख, आशिष खुलसंगे, प्रमोद वासेकर, वंदना आवारी, प्रमोद निकुरे, संध्या बोबडे, वंदना दगडी, मंगला झिलपे, राजू येलटीवार, सुरेश काकडे, रवी देठे उपस्थित होते.

शहर भाजपला सातत्याने भगदाड
सध्या काँग्रस-राष्ट्रवादी-सेनेच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. सत्ताधारी पक्षाकडे नेत्यांचा कल अधिक असतो. सत्ता असली की कामं होतात असे सर्वसाधारण मत नेत्यांचे असते. गेल्या वेळी भाजपची सत्ता असल्याने पक्षाला मोठा फायदा झाला होता. भाजपने एकहाती विजय मिळवत सर्व पक्षांना पाणी पाजले होते. इतर पक्षांना या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नव्हता. मात्र आता राज्यात सत्तांतर झाले आहे. त्यातच शहरातील भाजपच्या दोन नगरसेवकांना आधीच पक्षाने निलंबित केले आहे. आता तिस-या नगरसेवकांनी पक्ष सोडल्याने भाजपला शहरात चांगलेच भगदाड पडले आहे. येणा-या काळात भाजपला आणखी काही धक्के बसू शकते अशी शक्यता राजकीय क्षेत्रात वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षांनी आतापासूनच आगामी नगरपालिका निवडणुकीची तयारी जोमात केली आहे. त्यामुळे आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीची रंगत वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हे देखील वाचा:

भरधाव बोलेरोची अज्ञात वाहनाला भीषण धडक, गाडी चकनाचूर

मुकुटबन पोलीस स्टेशनचे वादग्रस्त ठाणेदारांसह 3 कर्मचारी निलंबित

Leave A Reply

Your email address will not be published.