मारेगाव तालुक्यातील एक बडा नेता काँग्रेसमध्ये येणाच्या तयारीत
राजकीय घडामोडींना वेग, नगरपंचायत निवडणुकीचे बदलू शकते गणितं
भास्कर राऊत, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील मोठं राजकीय प्रस्थ असलेला एक गट काँग्रेस प्रवेशासाठी इच्छूक आहे. याबाबत वरती फिल्डिंग लावण्यासह पक्ष प्रवेशाआधीची बार्गेनिंगही सुरू आहे. मात्र नेमका प्रवेश कधी होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. जर या नेत्याने त्याच्या गटासह प्रवेश केल्यास नगरपंचायतीचे गणितं बदलू शकते शिवाय काँग्रेसला अच्छे दिन ही येऊ शकते. मात्र दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आपले वर्चस्व धोक्यात तर येणार नाही यामुळे चिंता वाढली आहे.
मारेगाव तालुका हा राजकीय दृष्टीने वणी विधानसभा क्षेत्रावर प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रभाव टाकत असतो. वणी विधानसभा क्षेत्रातील आमदार सुध्दा या तालुक्यावर नेहमीच विशेष लक्ष ठेऊन असतात. याच तालुक्यामध्ये सध्या एक मोठी उलटफेर होण्याच्या मार्गावर असून तालुक्यातील राजकारणावर प्रभाव असलेला आणि आजपर्यंत महत्वाची अशी अनेक पदे उपभोगलेला एक मोठा गट काँग्रेस प्रवेशासाठी इच्छूक असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळले आहे.
आजपर्यंत मारेगाव तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाचाच बोलबाला होता. मधल्या काळात सेनेने मुसंडी मारत जिल्हा परिषदेच्या जागा पटकावलेल्या होत्या. परंतु मागील जी.प.निवडणुकीत काँग्रेस पक्षाने एकसंघतेचे दर्शन घडवत पुन्हा दोन्ही जिल्हा परिषदेच्या जागा काबीज करण्यात यश मिळवले. परंतु मागील साडे चार वर्षांमध्ये अनेक उलटफेर झाले. काहींच्या पाटाखालून मोठ्या धारेचे पाटाचे पाणी वाहून गेले. मध्यंतरीच्या काळात काँग्रेस दुभंगते की काय असे वाटून गेल्याशिवाय राहिले नव्हते.
आता नगरपंचायत व जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळच येऊन ठेपलेल्या आहेत. त्या निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेस सहित सर्वच पक्षांनी जोमात तयारी सुद्धा सुरू केलेली आहेत. अशातच राजकीय पटलावर काँग्रेस पक्षामध्ये एक मोठा गट येऊ पाहत असल्याचे चित्र आहे. तो नेमका कोणत्या अटीशर्तीवर येत आहेत हे मात्र कळले नसले तरी मात्र यांच्या येण्याने निवडणुकीमध्ये कॉंग्रेसला फायदाच होण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेस प्रवेशासाठी यांची युद्धस्तरावर बोलणी सुरू असून वरील नेतृत्वाने हा चेंडू स्थानिक पदाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आल्याचे सुद्धा कळते. आता स्थानिक पातळीवर असलेले पदाधिकारी काय निर्णय घेतात याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहे.
इतर नेत्यांमध्ये असुरक्षीततेची भावना
काँग्रेस मध्ये प्रवेशासाठी इच्छूक असलेल्या या नेत्यांमुळे तालुक्यातील आपले स्थान धोक्यात येईल अशी काही काँग्रेस जणांना भीती तर वाटत नाहीना अशीही शंका आल्याशिवाय राहत नाही. कारण मारेगाव तसेच बोटोनी विभागासोबतच मार्डी परिसरात सुद्धा यांचे प्रस्थ बऱ्यापैकी आहे. यांचा जर काँग्रेस प्रवेश झाला तर मारेगाव नगरपंचायत निवडणुकीत नक्कीच काँग्रेस नं. १ बनू शकते. तसेच येणाऱ्या अनेक निवडणुकांमध्येही फायदा होऊ शकतो. राजकीय क्षेत्रामध्ये एक प्रखर नेतृत्व म्हणून यांचा नावलौकिक होता. त्यामुळे प्रखर नेतृत्व काँग्रेस मध्ये आल्यानंतर प्रखरता कमी होईल की तशीच राहील हे येणारा काळच सांगेल. परंतु सुरू असलेल्या या प्रवेशाचा तिढा कधी सुटतो, की पुन्हा यांना काही काळ ताटकळतच राहावे लागेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.