जितेंद्र कोठारी, वणी: तालु्क्यातील मानकी येथे एका इसमाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. दुष्यंता नामदेव पिपराडे (57) असे मृतकाचे नाव आहे. मृतकाने दारूच्या नशेत आत्महत्या केल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुष्यंता नामदेव पिपराडे हा मानकी येथील रहिवाशी होता. शेती व मजुरी करून तो आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करायचा. मात्र त्याला दारू पिण्याची सवय होती. दारूच्या नशेत तो पत्नी आणि मुलीला शिविगाळ करत घरी वाद घालायचा. नेहमी प्रमाणे दु्ष्यंता हा शुक्रवारी रात्री दारू पिऊन घरी आला.
घरी येताच त्याने पत्नी व मुलीस शिविगाळ करण्यास सुरूवात केली. वाद वाढू नये म्हणून त्या दोघीही शेजारच्या घरी गेल्या. दरम्यान तो घरी एकटाच होता व त्याची दारुच्या नशेत शिविगाळ सुरूच होती. मात्र काही वेळाने दुष्यंताची शिविगाळ एकाएकी बंद झाली. त्यामुळे घरच्यांनी घरात डोकाऊन पाहिले असता दुष्यंताने घराच्या छताला दोरीने गळफास घेतला होता.
सदर दृष्य पाहून आई आणि मुली दोघीही घाबरल्या. त्यांनी तातडीने याची माहिती शेजा-यांना दिली. वणी पोलीस स्टेशनलाही याची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व पंचनामा केला. दुष्यंताचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. वणी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
दुष्यंता हा मनमिळावू स्वभावाचा होता. मात्र त्याला दारूचे व्यसन जडले. एरव्ही सर्वांशी मिळून मिसळून राहणारा व बोलणारा दुष्यंता दारू पिल्यानंतर मात्र आक्रमक व्हायचा अशी माहिती गावातून मिळत आहे. मृतकाच्या मागे पत्नी, 3 विवाहित मुली व 1 अविवाहित मुलगी आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.