गजानन कासावर यांना ‘सावरकर रत्न’ पुरस्कार प्रदान
स्वा. सावरकर राज्यस्तरीय साहित्य संमेलनात गौरव
सुनील बोर्डे, वणी: वणीतील स्वातंत्रवीर सावरकर नगर परिषद शाळा क्र.5 चे मुख्याध्यापक गजानन कासावर यांना ‘सावरकर रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मेळघाट मधील सेलाडोह येथे दि.10 नोव्हेंबरला पार पडलेल्या राज्य स्तरीय साहित्य संमेलनात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्वातंत्रवीर सावरकर मित्र मंडळ औरंगाबादच्या वतीने सावरकरांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी दरवर्षी देश विदेशात स्वा.सावरकर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. अशा संमेलनातून सावरकरांच्या विचारांची धुरा वाहून कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘सावरकर रत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते. या वर्षी 9 व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष प्राचार्य संजय पोहरकर प.पु.चंद्रतनय दादा, माजी राज्यमंत्री राजाभाऊ ठाकरे, शंकरराव गायकर, संमेलनाचे निमंत्रक भाऊ सुरडकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गजानन कासावर हे वणीच्या शैक्षणिक, साहित्य, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. दरवर्षी सावरकर शाळेमध्ये स्वा.सावरकरांची पुण्यतिथी मोठ्या प्रमाणावर साजरी करतात. त्यासोबत सावरकरांच्या जीवनावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धा वक्तृत्व स्पर्धेचे सुद्धा नियमित आयोजन करतात. त्यांना मिळालेल्या या बहुमानाबद्दल प्रेस वेल फेअर असोसिएशन, विदर्भ साहित्य संघ, नगर वाचनालय, भारतीय शिक्षण मंडळ, विदर्भ नगर परिषद शिक्षक संघ, मराठी विज्ञान परिषद, व मित्र मंडळी कडून कौतुक करण्यात येत आहे.